Pune News : हाय रिस्क प्रेग्नेन्सीचे प्रमाण 65 टक्क्यांनी वाढले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – गेल्या वर्षभरात पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमध्ये विविध कारणांमुळे हाय रिस्क गर्भधारणेच्या प्रकरणांमध्ये ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटल, पुणे येथील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ. गिरिजा वाघ सांगतात मधुमेह, उच्च रक्तदाब, एकाधिक गर्भधारणा, पीसीओएस, अशक्तपणा, हृदयरोग, लठ्ठपणा, दमा किंवा इतर कोणत्याही दीर्घकालीन आजारांसारखी आरोग्य समस्या असलेल्या मातांना गर्भधारणे दरम्यान धोका उद्भवू शकतो. ज्या मातांना स्वाइन फ्लू, डेंग्यू ताप, कावीळ किंवा मूत्रमार्गाच्या संसर्गाची लागण किंवा गर्भावस्थेतील गुंतागुंत झाल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा माता व जन्मलेल्या बाळाला याचा धोका असू शकतो. म्हणून सावधगिरी बाळगून वेळीच योग्य उपचार मिळवणे गरजेचे आहे.

पुण्यातील मदरहुड हॉस्पीटलच्या ज्येष्ठ सल्लागार प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ राजेश्वरी पवार म्हणाल्या–‘अलिकडच्या वर्षांत रुग्णालये आणि प्रसूतिशास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की गर्भवती महिलांना मधुमेह किंवा जुळी गर्भधारणा झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या गरोदरपणात विशेष काळजी आणि व्यवस्थापन कौशल्य आवश्यक आहे.बर्‍याच गर्भवती मातांना पीआयएच (गर्भधारणेदरम्यान-उच्च रक्तदाब) किंवा प्री-एक्लेम्पसिया नावाची स्थिती देखील माहित नसते – जेथे रक्तदाब वाढतो तसेच गर्भवती महिलेच्या पायांवर सूज येते आणि जेव्हा त्यावर वेळीच उपचार केले जात नाही तेव्हा मात्र गुतांगुंत निर्माण होऊ शकते. आई आणि तिचा जन्म न झालेल्या बाळासाठी हे धोकादायक ठरु शकते असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले. करिअरमुळे ब-याच महिला गर्भधारणेची प्रक्रिया पुढे ढकलतात. जसजसे गर्भधारणेचे वय वाढते तसतसे गर्भवती महिलेला मधुमेह आणि उच्चरक्तदाब तसेच बाळाला डाउन्स सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो . प्रजननाचे वयात गर्भधारणा न झाल्यास फर्टिलिटी क्लिनिकच्या मदतीने महिलांना आई होण्याचे स्वप्न पूर्ण करता येते. मात्र तज्ञांच्या सहाय्याने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे’.