Pune : चोराला पोलिसांनी ‘गाठलं’ Facebook वर अन् केलं रोमॅन्टिक चॅटिंग, ‘गुलूगुलू’ बोलणं सुरू होताच आवळल्या मुसक्या
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरातील दागिन्यावर डल्ला मारून पोबरा केलेल्या चोरट्याला पोलिसांनी फेसबुकवर मुलीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून जेरबंद केल्याची आगळी वेगळी घटना समोर आली आहे. त्याच्याकडून तब्बल 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 20 हजारांची रोकड असा एकूण 6 लाख 15 हजारांचा मुद्देमाल हस्तगत सांगवी पोलिसांनी हस्तगत केला आहे.
संदीप भगवान हांडे (वय 25, सध्या रा. वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे. मूळ रा. पिंपरखेडा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी संगीता अजित कांकरिया (52, रा. राजयोग बंगला, क्रांती चौक, कीर्ती नगर, नवी सांगवी) यांनी याबाबत 17 ऑक्टोबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांकरिया यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 40 हजारांची रोख रक्कम लंपास केली होती. या गुन्ह्याचा तपास करताना कांकरिया यांच्या घरी पूर्वी काम करणारा नोकर संदीप हांडे याच्यावर पोलिसांचा संशय होता. मात्र, तो कायम पत्ता बदलत असल्याने पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली. फेसबुकवर मुलीच्या नाव फेक अकाऊंट तयार केला. पोलिसांनी संदीपला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट पाहून त्याने लगेच ती ॲक्सेप्ट ( Acept) केली. त्यानंतर काही दिवस पोलीस त्याच्याशी रोमॅन्टिक चॅट ( Romantic chat) करत होते. त्याचा विश्वास बसल्यानंतर प्रेमाच्या आणाभाका देत पोलिसांनी त्याला कपल पॉईंटला भेटण्यास बोलवले. त्यानुसार, संदीप मनाशी मोठी स्वप्न रंगवत मुलीला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आला. त्यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला अलगद ताब्यात घेतले. संदीपने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली.