Pune News : मोबाईल चोरीच्या आरोपावरून हॉटेल मालक व वेटरकडून बेदम मारहाण, झाला मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मोबाईल चोरी केल्याच्या आरोपावरून हॉटेल मालक व त्याच्या वेटरने एकाला बेदम मारहाण केल्यानंतर त्या व्यक्तीचा यात मृत्यू झाला. पोलिसांनी खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

रवि दिप्लु राठोड (वय 40, रा. गोडबोेले वस्ती मांजरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सुरेश दिपलू राठोड (वय.28,रा. गोडबोले वस्ती मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल मोरे व बाबुराव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल मोरे याचे शिवशाही नावाचे व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे. गुुरुवारी सकाळी मोरे व त्यांचा वेटर बाबुराव जाधव हे गाणी ऐकत नाष्टा करत होते. त्यावेळी फिर्यादी सुरेश व त्यांचा मित्र रवी नाष्टा करण्यास आले होते. नाष्टाकरून दोघे बाहेर पडले. यावेळी हॉटेल मालक मोरे यांना त्यांचा मोबाईल ठेवलेल्या जाग्यावर दिसला नाही. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यात नाष्टा करून जाणार्‍या दोघांपैकी एकाने मोबाईल पळवल्याचा संशय आला. त्यानुसार मोरे व त्याच्या वेटरने पाठलाग करून काही अंतरावर दोघांना गाठले. मोबाईल चोरी केल्याच्या रागातून रवी राठोड याला बेदम मारहाण केली. मुका मार लागल्याने सुरुवातीला रवी याला काही जाणवले नाही. मात्र काही वेळानंतर त्रास होऊ लागल्याने त्याला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला. त्यानुसार हडपसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.