Pune News : पती, सासरच्या मंडळीकडून 28 वर्षीय विवाहितेचा छळ, कोंढव्यात महिलेची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पती आणि सासरच्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून 28 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे. काजल सागर झेंडे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत काजल यांच्या आई मुक्ताबाई मोरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात पती सागर दत्तू झेंडे (वय 29),सासू कौशल्या दत्तू झेंडे (वय 57) ननंद दिपाली भारत पवार (वय 37) आणि रुपाली मलिंद गरुड या चौघांना अटक केली आहे. तर सोनाली मोरे इच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल व सागर यांचा 2013 साली विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस त्यांच्यात सुखी संसार झाला. पण नंतर पती व सासरच्या व्यक्तींनी किरकोळ कारणावरून काजल यांच्याशी भांडण करण्यास सुरुवात केली. तू पांढऱ्या पायची आहेस तू आमच्या घरी आल्यापासून आम्हाला साडेसाती लागली आहे असे करून वारंवार मारहाण करून तिचा मानसिक छळ केला. शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून काजल यांनी 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चाऊस हे करत आहेत.