Pune News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणार्‍या पतीला आजन्म कारावास, 2015 मध्ये वारजे परिसरात घडली होती घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कु-हाडीने मान आणि डोक्यावर वार करून पत्नीचा खून करणा-या पतीस न्यायालयाने मरेपर्यंत कारावास (आजन्म कारावास) आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा खून करण्यात आला होता. सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा निकाल दिला. राजू दुसाणे (रा. आकाशनगर, वारजे) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याने ३० जानेवारी २०१५ रोजी वारजे येथील त्यांच्या राहत्या घरी पत्नी सविता यांचा खून केला होता. या प्रकरणी विनोद सुभाष दाभाडे (रा. वारजे जकात नाक्याजवळ) यांनी फिर्याद दिली होती.

खून केल्यानंतर दुसाणे वारजे पोलिस ठाण्यात हजर झाला होता. मी पत्नीचा खून केला आहे, असे त्यांने पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार त्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिस त्याला घेऊन घरी गेले. खून करण्यासाठी वापरण्यात आलेली कु-हाड आणि आरोपीच्या अंगावरील कपडे पोलिसांनी जप्त केले होते. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले. हा गुन्हा परिस्थिती जन्य पुराव्यावर आधारीत होता. साक्षीदाराने दुसाणे याला घराची कडी लावून घाईघाईने बाहेर पडताना पाहिले होते. तसेच आरोपींचे कपडे आणि कु-हाड जप्त करण्यात आली होती. वैद्यकीय अहवाल व इतर बाबींवर गुन्हा सिद्ध करता आला, असे ॲड. मोरे यांनी सांगितले.

एक फोन ठरला संशयाचे कारण :
खून करण्याच्या एक महिना आधी सविता यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता. हा फोन आल्याचे दुसाणे याने पाहिले होते. तेव्हापासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यानंतर त्याने पत्नीला मारहाण केली. तसेच एक दिवस सविता यांच्या साडीचा पदर पेटवून दिला होता. त्यांच्या मुलीने ती आग विझवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दुसाणे दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे.