Pune News : मित्र पोलिस आयुक्तांच्या गाडीवर ड्रायव्हर असल्याचं सांगत पतीनं पत्नीला दिली जीवे ठार मारण्याची धमकी, न्यायालयाकडून तपासाचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पती-पत्नीच्या वादानंतर पतीने त्याचा मित्र पोलीस आयुक्त यांच्या गाडीवर ड्रायव्हर असल्याचे सांगत पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने न्यायालयात धाव घेतली आणि कारवाई करण्याची विनंती केली. न्यायालयाने गुन्हा दाखल करत तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

ललिता विठ्ठल भंडारी (वय 40, रा. जनता वसाहत पर्वती, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पती गोपीनाथ विठ्ठल वाघ, ज्योतिबा वाघ आणि अनिल काळे यांच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व गोपीनाथ वाघ हे पती-पत्नी आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. पण त्यांचे सध्या कौटुंबिक वाद सुरू आहेत. न्यायालयात हे वाद सुरू आहेत. दरम्यान फिर्यादी यांना घर घ्यायचे होते. त्यामुळे त्या पैसे जमा करत होत्या. त्यांनी रोख 75 हजार रुपये व काही सोन्याचे दागिने जमा करून ते घरात ठेवले होते. हे दागिने आणि रोख रक्कम घरात न सापडली नाही. गोपीनाथ वाघ याने चोरल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. फिर्यादी यांनी गोपीनाथ वाघ याला फोन करून घरातील रोख रक्कम आणि दागिने कुठे गेले असे विचारले असता त्याने दागिने मी चोरून नेले आहेत, तुला काय करायचे ते कर असे सांगितले. तसेच यातील अनिल काळे हा माझा मित्र आहे. तो पोलीस आयुक्त यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहे. त्याची अन माझी चांगली ओळख आहे असे सांगत इतर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र याबाबत अनिल काळे यांना काही माहिती नसल्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले. याप्रकरणी फिर्यादी यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.