Pune News : मानलं भावा ! बहिणीची सरपंचपदी निवड होताच भावाकडून आलिशान चारचाकीची ‘ओवाळणी’

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील आष्टापुर गावच्या सरपंचपदी कविता जगताप यांची तर उपसरपंचपदी विकास कोतवाल यांची बिनविरोध निवड झाली. ही निवडणुक पार पाडताच सरपंच कविता जगताप यांना त्यांचे बंधू रामकृष्ण सातव पाटील यांनी ईनोवा मोटार भेट देत बहिणीला आश्चर्याचा धक्का दिला. भावाच्या या आश्चर्याचा धक्काने बहिणीचा आनंद गगणाला मावेनाशा झाला होता.

आष्टापुर ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंदाची निवडणुक बिनविरोध पार पडली यावेळी सरपंच, उपसरपंचपदासाठी प्रत्येकी एक एकच अर्ज आल्याने मंडलाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी दिपक चव्हाण यांनी सरपंचपदी कविता जगताप यांची तर उपसरपंचपदी विकास कोतवाल यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यांना ग्रामविकास अधिकारी ज्योत्स्ना बगाटे यांनी सहाय्य केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी गावच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वाना सोबत घेत ,जेष्ठाच्या आशीर्वादने विकासाची वैशिष्टयपूर्ण कामे करणार असल्याचे सरपंच कविता जगताप यांनी सांगितले.

भाऊ – बहिणीच्या नात्याचा आदर्श….
अनेक ठिकाणी वाढते औद्योगीकरण आणि जमिनीच्या वाढत्या बाजारभावामुळे भाऊ-बहिणीच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. अष्टापुर गावात मात्र बहिण सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर भावाने त्यांना ईनोवा मोटार भेट देत भाऊ -बहिणीच्या नात्यातील बंध अजून घट्ट केल्याचे पाहवयास मिळाले .