Pune News : धंदा करायचाय तर मग 5 ‘पेटी’ दे अन्यथा गोळया घालण्याची धमकीः 2 लाखाची खंडणी घेणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   स्क्रॅप व्यवसायिकाला धंदा करायचा असल्यास 5 पेटी मागत गोळ्या घालण्याची धमकी देऊन 2 लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. तर दोघे पसार झाले आहेत.

याप्रकरणी राहुल जाधव (वय 29, रा शिंदेवाडी लोहगाव) व योगेश चांदणे (वय 28, रा गणपती चौक विमाननगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर

रामा माने ( वय 30, रा.दुर्गामाता मंदिरमागे, चंदननगर) व प्रवीण गुलाब जाधव (वय-27,रा. वडगाव शिंदे, ता. हवेली) हे फरार आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 34 वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली आहे.

फिर्यादी हे नगर रस्त्यावर राहतात. त्यांचा खराडी आयटी पार्क परिसरात स्क्रॅप विक्रेते आहेत. दरम्यान त्यांना दोन दिवसांपूर्वी अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. त्या व्यक्तीने “तुला धंदा करायचा असेल तर 5 पेटी दे, नाहीतर गोळ्या घालील” अशी धमकी देत खंडणीची मागणी केली होती. त्यांनी तात्काळ खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तसेच आरोपींना माहिती न होऊ देता त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर फिर्यादी यांना 2 लाख रुपये देतो, असे सांगत त्यांना संपर्क ठेवण्यास सांगितले.

त्यानुसार आज गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याणी नगर परिसरात फिर्यादी यांच्याकडून 2 लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर यात आणखी दोघांचा समावेश असल्याचे आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. तर दोघांचा शोध घेतला जात आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे. सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी संपत अवचरे, विनोद साळुंके, प्रदीप शितोळे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे व म पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.