Pune News : कमला नेहरू रूग्णालयात रक्तपेढी उभारण्यासोबतच विविध विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कामे तात्काळ मार्गी लावावीत – गणेश बीडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महानगर पालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयात सुसज्ज रक्तपेढी उभारण्याबरोबरच विविध विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचना पालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी मंगळवारी प्रशासनाला केल्या.

पुणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न कमला नेहरू रूग्णालय आहे. या पार्श्वभूमीवर या रूग्णालयात नागरिकांच्या सोयीसाठी अनेक विभाग सुरू केले जाणार आहेत. विविध बाह्यरुग्ण विभाग येथे सुरू केले जाणार असून त्यातील काही काम सुरू करण्यात आले आहे. पालिकेतील विविध खात्यांच्या विभागप्रमुखांसह सभागृह नेते गणेश बीडकर यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी आवश्यक त्या सूचना प्रशासनाला करत ही काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, डॉ. अंजली साबणे, भवन विभागाचे शिवाजी लंके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. लता त्रिंबके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. कमला नेहरू रूग्णालयात दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा यावेळी घेण्यात आला. या रूग्णालयात सुरू होत असलेल्या विभागांसाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तसेच तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही गणेश बिडकर यांनी दिली. पालिकेच्या भवन रचना, विद्यूत या दोन विभागांनी आपली कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना करताना पुढील पंधरा दिवसात पुन्हा या कामाचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.