Pune News : पुण्यात ‘या’ वेळेदरम्यान ‘संचारबंदी’ नव्हे तर ‘संचार’ निर्बंध ! शाळा-महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याचं समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. पुणे-पिंपरी आणि पुणे जिल्हयात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (रविवारी) महत्वाची बैठक घेऊन महत्वाच्या सुचना विभागीय आयुक्त आणि इतर प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांनी पुणे शहरात संचारबंदी नव्हे तर उद्यापासून (सोमवार) रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचार निर्बंध असल्याचं स्पष्ट केलं आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्हयातील शाळा-महाविद्यालये येत्या 28 फेबु्रवारीपर्यंब बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतल्याचं देखील सौरभ यांनी सांगितलं आहे.

पुणे शहरात रात्री 11 वाजेपर्यंत हॉटेल चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरातील कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत. लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम, खासगी समारंभात केवळ 200 लोकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात येणार आहे. लग्न समारंभासाठी आयोजकांनी पोलिस विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक खिडकी योजना देखील सुरू करण्यासाठीच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ यांनी दिली आहे. लग्न समारंभासाठी पोलिसांकडे परवानगी मागितल्यास पोलिस 2 तासांमध्ये ती परवानगी देतील असेही त्यांनी सांगितले. पुणे शहरातील हॉटस्पॉट अधोरेखित करण्यात आले आहेत. दरम्यान, तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. कोविड-19 रूग्णालये तसेच जम्बो कोविड सेंटर पुन्हा चालू करावे लागले तर त्याबाबत प्रशासन तयार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

* पुढील आदेशापर्यंत खासगी कोचिंग क्लासेस बंद
* उच्च शिक्षण, स्पर्धा परिक्षासाठी चालू असणार्‍या अभ्यासिका निम्म्या संख्येच्या अटीवर चालू राहतील
* हॉटेल, बार, रेस्टॉरंट हे रात्री 11 वाजेपर्यंतच चालू राहणार