Pune News : मिळकतकर विभागाने वळविला ‘मोबाईल टॉवर्स’ कडे मोर्चा ! कर आकारणी न झालेल्या ‘टॉवर्स’ची ऍसेसमेंट सुरू; 200 हून अधिक टॉवर्सच्या माध्यमातून 25 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मिळकतकराचे उत्पन्न वाढावे यासाठी सातत्याने प्रयत्न करणार्‍या पुणे महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने आता ‘मोबाईल टॉवर’ कंपन्यांकडे वसुलीसाठी मोर्चा वळविला आहे. मागील काही वर्षांपासून महापालिकेच्या परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवर्सची आकारणी सुरू केली असून संबधित ऑपरेटर्स कंपन्यांना नोटीसही पाठविण्यास सुरूवात केली आहे. शहरात आकारणी न करताच बसविण्यात आलेले आणि सध्या वापरात असलेले २०० हून अधिक टॉवर्स आहेत. यांच्याकडे आकारणी केल्यानंतर २५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असा विश्‍वास मिळकतकर प्रमुख सहआयुक्त विलास कानडे यांनी सांगितले.

पुणे शहरातील विविध इमारतींवर मोबाईल सेवेसाठी टॉवर्स उभारण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षात या टॉवर्सची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. महापालिकेेने कुठलिही परवानगी न घेता उभारलेल्या टॉवर्सबाबत संबधीत कंपन्यांना तीनपट कर आकारणी केली होती. या विरोधात काही कंपन्यांनी न्यायालयातही दाद मागितली आहे. या न्यायालयीन लढ्यामुळे मोबाईल टॉवर्सचा मिळकतकर, दंड आणि दंडावरील व्याज अशी दोन हजार कोटींहून अधिक थकबाकी राहीली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे उत्पन्न घटल्याने पालिकेने थकबाकीसाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. ५० लाखांपर्यंतची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांसाठी अभय योजना राबविण्यात आली होती. यातून मोबाईल टॉवर्सची थकबाकी वगळण्यात आली होती.

अभय योजना संपल्यानंतर कर आकारणी विभागाने आता मोबाईल कंपन्यांकडे मोर्चा वळविला आहे. महापालिकेने यापुर्वी आकारणी केलेल्या मोबाईल टॉवर्सचे प्रकरण न्यायालयात असताना काही कंपन्यांनी २०१७ पासून शहरात विविध ठिकाणी टॉवर्स उभारले आहेत. यामध्ये रिलायन्स, रिलायन्स जिओ, इंडस, एअरटेल आदी कंपन्यांचे २०० हून अधिक टॉवर्स असल्याची प्रशासनाची प्राथमिक माहिती आहे. कर आकारणी विभागाने मागील तीन चार दिवसांपासून अशा मोबाईल टॉवर्सच्या करारावरून कर आकारणी करण्यास सुरूवात केली आहे. टॉवर्सच्या कर आकारणीतून महापालिकेला २५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा सहआयुक्त विलास कानडे यांनी व्यक्त केली आहे.