Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना काळात आर्थिक संकट वाढले असतानाही महापालिकेने मिळकत थकबाकीदारांसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेला अभूतपुर्व प्रतिसाद मिळाला. महापालिकेने १ ऑक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत जाहीर केलेल्या अभय योजनेतून तब्बल ४७७ कोटी २० लाख रुपये थकबाकी वसुल झाली असून मिळकतकराचे एकत्रित उत्पन्नही वाढले आहे.

पुणे महापालिकेला दरवर्षी मिळकतकरातून साधारण बाराशे कोटी रुपये उत्पन्न मिळते. यंदाच्यावर्षी २५ जानेवारीपर्यंत १ हजार ३८० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने १ ऑक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत जाहीर केलेल्या मिळकतकरावर आकारलेल्या दंडावरील सवलत देण्याच्या अभय योजनेमुळे ही उत्पन्न वाढ झाली आहे. स्थायी समितीने १ ऑक्टोबर पासून ३० नोव्हेंबरपर्यंत अभय योजना लागू करताना दंडाच्या रकमेत ८० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत तब्बल १ लाख १४ हजार ६३१ थकबाकीदारांनी ३५१ कोटी १८ लाख रुपये मिळकतकर जमा केला. यानंतर या योजनेला १० डिसेंबरपासून मुदतवाढ देताना १० डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत थकबाकी भरणार्‍यांना दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात आली होती. त्यानंतर २६ जानेवारीपर्यंत थकबाकी भरणार्‍यांना दंडाच्या रकमेत ७० टक्के सवलत देण्यात आली होती. या कालावधीत ३४ हजार १७९ थकबाकीदारांनी १२६ कोटी १ लाख रुपये थकबाकी भरली आहे.

कोरोनासारख्या कालावधीत पुणेकर नागरिकांनी महापालिकेवर विश्‍वास दाखवत मोठ्याप्रमाणावर थकबाकी भरली आहे. मिळकतकर उत्पन्नाच्या बाबतीत पुणे महापालिका आघाडीवर राहीली आहे. नियमीत कर भरणार्‍या मिळकतकर धारकांसोबतच १ लाख ४८ हजार ८१० जणांनी ४७७ कोटी २० लाख रुपये थकबाकी भरली आहे. पुढील वर्षिपासून या थकबाकीदारांनी नियमीतपणे वेळेत कर भरल्यास महापालिकेचे उत्पन्न वाढणार आहे. कोरोनामुळे आठ ते नउ महिने शहरातील विकासकामे जवळपास ठप्प झाली होती. परंतू मिळकतकर विभागाने चांगली कामगिरी केल्याने या आर्थिक वर्षात पालिकेचे वार्षिक उत्पन्न साडेचार हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल आणि विकासकामांनाही गती देण्यास मदत होणार आहे.

– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती.