Pune News : ‘महाजेनको’ निर्मिती संचालकपदाच्या नियुक्ती प्रक्रियेची चौकशी करा – विश्वास पाठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या मर्जीतील व्यक्तीची ‘महाजेनको’च्या निर्मिती संचालकपदी पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सध्या मुलाखतींचा फार्स चालू आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यायचे नाही असे म्हणत त्या नियमाला बगल देण्यामागे कोणाचे हितसंबंध दडले आहेत का याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ऊर्जा खात्याचे माजी संचालक असलेल्या पाठक यांनी सांगितले की, ‘महाजेनको’चे निर्मिती संचालकपद गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त आहे. या पदावर कार्यरत असलेल्या थोटवे हे 31 ऑगस्ट 2020 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचीच या पदावर पुन्हा नियुक्ती व्हावी, यासाठी कोरोना कालावधीत घाईघाईने 27 ऑगस्ट रोजी 10 उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीमधून दोन उमेदवारांची निवड झाली. मात्र या नावांमध्ये थोटवे यांचे नाव नसल्यामुळे या मुलाखतीचे निकाल जाहीर केले नाहीत. मर्जीतल्या व्यक्तीची निवड झाली नाही म्हणून वरिष्ठांनी पूर्ण निवड प्रक्रियाच रद्द करून निवडल्या गेलेल्या उमेदवारांवर अन्याय केला.