Pune News : आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ 2021 च्या जुन महिन्यापासून प्रत्यक्षात सुरु होणार, नव्या क्रीडा विद्यापीठाला 27 प्राध्यापकांची आवश्यकता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ निर्मितीचा निर्णय शासनाने घेतला आहे. केवळ निर्णय न घेता 2021 च्या जुन महिन्यापासून प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष ही सुरु करण्यात येणार आहे.

क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक अधिनियम प्रारुप तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अधिनियम प्रारुप विधेयकास विधि व न्याय विभागाच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळाने ही मान्यता दिली. प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स, स्पोर्टस टेक्नॉलॉजी व स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे तीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.

त्यामध्ये स्पेार्टस सायन्स आणि स्पोर्टस टेक्नॉलॉजी हे प्रत्येकी तीन वर्षांचे कोर्स असून स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे तीन महिन्यांचे असणार आहेत. या कोर्समधून प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये प्रशिक्षक म्हणून संधी मिळू शकणार आहे. सध्या या कोर्सची फी किती असावी, कोर्समध्ये कोणत्या विषयांचा समावेश असावा, कोणत्या विषयाला किती प्राध्यापक आदिंचा आराखडा तयार करण्याचे काम सुर असून एकूण 27 प्राध्यापकांची आवश्यकता असल्याचा अहवाल क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने पाठविलेला आहे. त्यानुसार नव्या क्रीडा विद्यापीठाला 27 प्राध्यापकांची आवश्यकता असल्याचे दिसून आले आहे.

विद्यापीठासाठी सध्याच्या आवश्यकतेनुसार 5 वर्षांकरीता 213 पदे अपेक्षित आहेत. त्यामध्ये ही नियमित वेतनश्रेणीतील 166 पदे व ठोक वेतनावरील 47 पदे भरण्याचे नियोजित आहे. या सर्वांमधून पहिल्या वर्षी 133 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये कुलगुरु, रजिस्ट्रार त्यांची कार्यालयीन पदे, शिक्षकीय पदे व प्रशासकीय पदे यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाला मान्यता मिळाली असून त्यासाठी 400 कोटींचा प्राथमिक निधी मंजुर करण्यात आला आहे. हे विद्यापीठ बालेवाडी येथे होणार असून स्टेडियमची चाचपणी सध्या सुरु आहे. प्रथमतः कुलगुरु आणि रजिस्टार पदाची भरती होणार असून या भरतीनंतर फी किती असावी, प्राध्यापक, विषयांची निवड, कर्मचारी आदींचा निर्णय नवनियुक्‍ती कुलगुरुंच्या अधिपत्याखाली होणार आहे. हे संपुर्ण विद्यापीठ शासनाच्या आदेशानुसारच चालणार असून क्रीडा व युवक सेवा संचालनालय केवळ सहकार्याची भुमिका ठेवणार आहे. अद्याप अनेक गोष्टींबाबत निर्णय घेण्याचे काम सुरु असल्याचे त्याबाबत सविस्तर माहिती देणे उचित ठरणार नाही.
ओमप्रकाश बकोरिया (आयुक्‍त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय)