Pune News : मनपाचे बंद नलिकेतील पाणी स्वच्छ आहे का ?, नागरिकांचा संतप्त सवाल–जलवाहिन्या आणि व्हॉल्व्हची दुरुस्ती तातडीने करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बापरे… आपण महापालिकेने फिल्टर करून दिलेले बंद नलिकेद्वारे दिलेले पाणी नाही तर चक्क दुर्गंधीयुक्त पाणी पित आहोत. यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. तरीसुद्धा ही बाब खरी आहे. जलवाहिनी फुटली, त्या ठिकाणी खड्डा पडून विसर्ग बंद झाल्यानंतर माती, कचरा त्या नलिकेमध्ये साचून तेच पाणी आपण पितो आणि साथीच्या आजाराचे शिकारी बनतो. याबाबीकडे महापालिकेचा आरोग्य आणि पाणीपुरवठा विभाग गांभीर्याने कधी पाहणार, असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून बंद नलिकेतून नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. मात्र बंद नलिका अनेक ठिकाणी लिकेज आहेत, त्या ठिकाणी खड्डा पडला आहे. पाण्याचा प्रवाह बंद झाल्यानंतर त्यामध्ये माती, कचरा, जात आहे, तर अनेक व्हॉल्व्ह कालव्यामध्ये आहेत, त्यावर नागरिक कचरा टाकत असल्याने पाण्याचा प्रवाह बंद झाल्यानंतर त्यामध्ये कुजलेल्या कचऱ्याचे पाणी जात आहे, ही बाब पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास आणूनदेखील त्यावर ठोस उपाययोजना का केली जात नाही.

शहर, उपनगर आणि परिसरामध्ये पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे काम महापालिकेतील पाणीपुरवठा विभाग करीत आहे. हेच पाणी आपण सर्वजण पितो. मात्र, शहर, उपनगर आणि परिसरातील जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटली आहे, तेथे पाण्याचा प्रवाह बंद झाल्यानंतर जलवाहिनी फुटली आहे, त्या खड्ड्या साचलेला कचरा, माती त्या जलवाहिनीमध्ये साठून राहते आणि पाण्याचा प्रवाह सुरू झाला की, कचरा, माती वाहून आपल्या घरापर्यंत येते. नळाला पाणी आल्यानंतर महिला सुरुवातील पाणी सोडून देतात, हंडा, पिण्याच्या पाण्याची भांडी पुन्हा स्वच्छ करतात. मात्र, बंद जलवाहिनीतून आलेली दुर्गंधी बाजूला कशी काढणार अशी विचारणा आता गृहिणींकडून केली जात आहे.

हडपसर गाडीतळ येथील कालव्याशेजारी जलवाहिनी फुटली असून, तेथे खड्डा पडला आहे. पाण्याचा प्रवाह सुरू झाला की, पाणी रस्त्यावर वाहते आणि प्रवाह बंद झाला की, पाणी खड्ड्यात साचून राहते. त्यामध्ये पाणी, कचरासुद्धा साचलेला असतो. तेथेच खाद्यपदार्थ विक्रीची छोटी हॉटेल्स आहेत, तेथील खरकटे तेथे सांडलेले असते. शेजारील कालव्यामध्ये जलवाहिनीचा उघड्यावर व्हॉल्व्ह आहे. कालव्यातील पाण्याचा विसर्ग बंद असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि भाजीपाला विक्रेते कचरा तेथे टाकतात, त्यातील कचरा व्हॉल्व्हवरसुद्धा पडतो. कचरा कुजून दुर्गंधीयुक्त पाणी त्या व्हॉल्व्हमधून जलवाहिनीमध्ये जाते, तेच पाणी आपण पालिकेने स्वच्छ करून दिले म्हणून विश्वासाने पितो. हे पाणी खर्च स्वच्छ आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनासुद्धा हेच पाणी प्यावे लागते. तरीसुद्धा त्यांच्याकडून फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करणे, तसेच व्हॉल्व्हर कचरा टाकतात, त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाही, असा प्रश्न सामान्यजनांना पडला आहे.