Pune News : लक्ष्मी रस्त्यावरील नीलकंठ ज्वेलर्समधील दागिन्यांची चोरी करणार्‍याला अटक, 9.59 लाखाचे दागिने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   लक्ष्मी रस्त्यावरील प्रसिद्ध नीलकंठ ज्वेलर्सच्या दुकानात दागिन्यांची चोरी करणाऱ्या कामगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. चोरलेले 9 लाख 59 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

राजेंद्र उर्फ बापु तुकाराम साळुंखे (वय 39) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत साहिब दयालसिंग दिलबाग सिंग बीर (वय 37) यांनी तक्रार दिली होती.

बिर यांचे लक्ष्मी रस्त्यावर नीलकंठ ज्वेलर्स दुकान आहे. 14 फेब्रुवारीच्या रात्री दिवसभर विक्री झालेल्या व शिल्लक राहिलेल्या दागिन्यांची मोजमाप केली जाते. त्यात 9 लाख 59 हजार रुपये किमतीचे दागिने कमी असल्याचे आढळून आले. त्यानंतर दुकानातील सर्व कामगारांकडे विचारपूस केली. पण काहीच माहिती मिळत नसल्याने बिर यांनी तक्रार दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती. यावेळी दुकानातले कामगार वर्गाकडे चौकशी सुरू केली. चौकशीत कामगार राजेंद्र उर्फ बापू तुकाराम साळुंखे हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याविषयी पोलिसांना संशय आला. यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेत पुन्हा चौकशी केली. पण तो नकार देत होता. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. तर घरातच दागिने लपवले असल्याचे सांगितले. पोलिसांनी ते दागिने जप्त केले. अधिक तपासात “कर्ज झाले, म्हणून ते फेडण्यासाठी चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, सचिन जाधव, अय्याज दडीकर, प्रशांत गायकवाड, अजय थोरात, महेश बामगुडे, सतीश भालेकर, योगेश जगताप, मीना पिंजन यांच्या पथकाने केली आहे.