Pune News : तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍या बंडू आंदेकरसह दोघांना अटक

पुणे : आंदेकर टोळीचे वर्चस्व कमी होण्यास कारणीभूत ठरल्याने तसेच पूर्ववैमनस्याने तरुणावर पालघन सारख्या हत्याराने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी बंडु आंदेकर व त्याच्या टोळीतील ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बंडुअण्णा ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६०), ऋषभ देवदत्त आंदेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. गणेश पेठ, बाबु आळी) याने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ओंकार कुडले आणि आंदेकर टोळी यांच्या यापूर्वी अनेकदा वादावादी झाली आहे. शहराच्या मध्य वस्तीत आंदेकर टोळीचे वर्चस्व आहे. कुडले याच्यामुळे आपल्या टोळीचे वर्चस्व कमी होत असल्याचे बंडु आंदेकर याला वाटत होते. त्यातूनच त्याच्या सांगण्यावरुन व पूर्ववैमनस्यातून ऋषभ आंदेकर, सुरज ऊर्फ गणेश, गाडी गण्या अशा ५ जणांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ओंकार याच्यावर पालघन, कोयता अशा धारधार हत्याराने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कुडले याच्या फिर्यादीनंतर काल रात्री उशिरा बंडुअण्णा आंदेकर व ऋषभ आंदेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

आंदेकर – माळवदकर या दोन टोळ्यांमधील टोळी युद्ध पुणे शहरात गाजले होते. या टोळीयुद्धात बंडु आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षाही झाली होती. १९८५ पासून बंडु आंदेकर याच्या खून, खुनाचा प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे अपहरण अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हा फरासखाना, खडक व समर्थ पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

दरम्यान, मध्यरात्री उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर व खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बहिरट यांच्या पथकाने बंडू आंदेकर आणि एकाला घरातून पकडले. यावेळी काही काळ तणावाचे वातवरण निर्माण झाले होते.