Pune News : हडपसर आणि कोंढवा परिसरातून दुचाकी चोरणार्‍यांना कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  हडपसर आणि कोंढवा परिसरातून पार्क केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. चोरट्यांकडून 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

जावेद अरिफ शेख (वय 41), अमिर मोहम्मद शेख (वय 24, दोघे रा. नुराणी मशीदजवळ, कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांकडून मोठी गस्त घातली जात आहे. तर वाहन चोरट्यांवर लक्ष ठेवले जात आहे. कोंढवा पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी शेखला संशयावरून थांबविले. त्यांच्याकडे दुचाकीच्या कागदपत्राची विचारणा केली. पोलीस कर्मचारी अमित साळुंखे, ज्योतिबा पवार यांनी त्या दोघांची चौकशी केली. चौकशीत त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 5 गुन्हे उघडकीस आणत 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक निरीक्षक चेतन मोरे, हवालदार रमेश गरूड, निलेश वणवे, अमित साळुंखे, सुदाम वावरे, संजीव कळंबे, ज्योतिबा पवार, किशोर वळे, आदर्श चव्हाण, लक्ष्मण होळकर यांनी ही कारवाई केली आहे.