Pune News : कोरेगाव पार्क’मध्ये स्पाच्या नावावर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा स्वारगेट पोलिसांकडून पर्दाफाश, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची कंट्रोल रूममध्ये बदली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पाच्या नावावर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर स्वारगेट पोलिसांनी कारवाई केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. येथून तब्बल 7 मुलींची सुटका करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

याप्रकरणी नूतन अमोल धवन (रा. केशवनगर) आणि रवी बलभीम जमादार (वय 25) यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र स्थानिक पोलिसांकडून कारवाईला फाटा दिला जात असल्याचे दिसत आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत लेन नंबर 7 मध्ये ‘स्काय स्पा’ सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्वारगेट पोलिसांना याठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी याठिकाणी सायंकाळी छापा मारला. यावेळी येथून तब्बल 7 मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर मॅनेजर रवी याला पकडले. नूतन याच्या सांगण्यावरून हा वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान कोरेगाव पार्कच्या हद्दीत स्वारगेट पोलिसांनी कारवाई केल्याने पोलीस दलात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.

तर दुसरीकडे योगायोगाने कोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद पत्की यांची बदली करत त्यांना नियंत्रण कक्षात देण्यात आले आहे. त्यांच्या ठिकाणी आता विशेष शाखेत असणारे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी या कारवाईची आणि बदलीचा काही संबंध नसल्याचे सांगितले.