Pune News : गजानन मारणेच्या आणखी 6 साथीदारांना अटक; आलिशान 4 गाडयाही केल्या जप्त

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणुक काढून पोलिसांना शह देण्याचा प्रयत्न करणार्‍या कुख्यात गजानन मारणे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचा पसाटा लावला असतानाच त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन अटक करण्याचा सिलसिला सुरु आहे. मंगळवारी दिवसभरात कोथरुड पोलिसांनी मारणे याच्या आणखी ६ साथीदारांना अटक केली असून चार आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत.

समीर प्रमोद पाटील (वय २९, रा. इंदिराशंकरनगरी, कोथरुड), अतुल बबु ससार (वय ३४, रा. मोकाटेनगर, कोथरुड), राहुल दत्तात्रय उभे (वय ३६, रा. एम आय टी कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड), सागर शंकर हुलावळे (वय ३२, रा़ शास्त्रीनगर, कोथरुड), रामदास ज्ञानेश्वर मालपोटे (वय ३४, रा. सुतारदरा, कोथरुड) आणि कैलास भागुजी पडवळ (वय ३२, रा. श्रीराम कॉलनी, सुतारदरा, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी गजानन मारणे याची त्याच्या समर्थकांनी जंगी मिरवणुक काढली. एक्सप्रेस हायवेवरुन सुमारे ३०० आलिशान गाड्यांचा ताफा पुण्याकडे आला होता. त्यांनी संपूर्ण एक्सप्रेस हायवेचा ताबा घेतला होता. याप्रकरणी तळेगाव दाभाडे, हिंजवडी, वारजे आणि कोथरुड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

कोथरुड पोलिसांनी गजानन मारणे याला अटक केल्यानंतर दुसर्‍या दिवशी मारणे व त्याच्या १० समर्थकांची जामिनावर सुटका केली. त्यानंतर मारणे हा फरार झाला आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ व फोटोवरुन पोलिसांनी त्यांचे साथीदार व मिरवणुकीतील सामील गाड्यांचा शोध सुरु केला आहे. कोथरुड पोलिसांनी यापूर्वी ७ गाड्या जप्त केल्या आहेत. मंगळवारी कोथरुड पोलिसांनी या ताफ्यातील मर्सिडीज, जग्वार, पजेरो, महिंद्रा स्कॉपिओ अशा ४ गाडया जप्त केल्या आहेत.

तळेगाव दाभाडे पोलिसांनी यापूर्वी १७ जणांना अटक केली असून ११ चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. याबरोबरच सोशल मिडियावरुन दहशत पसरविल्याबद्दल बंडगार्डन पोलीस ठाण्यात मंगळवारी आणखी एक गुन्हा गजानन मारणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.

गजानन मारणे हा फरार झाला असला तरी जर तो सापडला नाही तर पुणे पोलिसांकडून त्याला फरार घोषित करुन त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरु करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तयारी सुरु केली आहे.