Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगारांच्या टोळीला कोथरूड पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  डुक्कर खिंडीच्या परिसरात पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी, घातक शस्त्रे जप्त केली आहेत.

समीर अंकुश पासरलकर (वय २३, रा. केळेवाडी, कोथरूड), प्रमोद बळीराम साठे (वय २९, रा. बालगुडी, मुळशी), ऋषिकेश राजेंद्र ठाकूर ( वय २१, मातरवाडी, मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस नाईक विजय कांबळे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत गुन्हेगारांची माहिती काढत आहेत. यावेळी कोथरूड पोलीस पेट्रोलिंग करीत असताना डुक्कर खिंडीच्या जवळील उरितनगर टेकडीलगत असलेल्या एका पेट्रोल पंप परिसरात टोळक्याची संशयास्पद हालचाल पोलिसांना दिसून आली. त्यानुसार पोलिसांनी समीर, प्रमोद, ऋषिकेशला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे घातक शस्त्रे आणि दोन दुचाकी मिळून आल्या.

प्रमोद साठे हा कोथरूड पोलीस ठाण्याच्या खुनाच्या गुन्ह्यात व लोणावळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी तसेच अपहरणाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आहे, तर समीर हा शहरातून तडीपार केलेला आहे. तरीही तो येऊन गुन्हा करण्याच्या तयारीत होता. तसेच, ठाकूर याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आसाराम शेटे, उपनिरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.