Pune News : शरद पवार बहुउद्देशीय भवन येथे कोविड लसिकरण केंद्र सुरु करावे : नगरसेवक विशाल तांबे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३९ येथील शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन येथे जून महिन्यापासून महापालिकेचे कोरोना संसर्ग चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी RT-PCR आणि रेपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट या दोन्हीही टेस्ट करण्यात येतात. आज पर्यंत जवळपास २१००० हुन अधिक नागरिकांच्या टेस्ट करण्यात आलेल्या आहेत, सद्यस्थितीत याठिकाणीच कोविड रणनिती कक्ष (वॉर रुम) ही कार्यरत आहे. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ३५.३९,४०,४२ या चार प्रभागातील नागरिकांना हे केंद्र मध्यवर्ती व सोयीचे ठिकाण आहे. यामुळे जवळपास पाच ते सहा लाख नागरिकांना या आरोग्य सुविधेचा लाभ होत आहे. जानेवारी महिन्यापासून केंद्र सरकार व राज्य सरकार त्याचबरोबर पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्तपणे कोविड लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.

याकरिता शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन येथे प्रशासकीय कर्मचारी अधिकारी व नागरिक यांच्या सोयीकरता याठिकाणी कोविड लसीकरण केंद्र पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात यावे. अशी मागणी नगरसेवक विशाल तांबे यांनी केली आहे.

कोविड लसीकरण केंद्राकरता लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा या वास्तूमध्ये उपलब्ध आहेत. तसेच हे ठिकाण मध्यवर्ती असल्यामुळे अधिक सोयीचे व सुरक्षित आहे. त्यामुळे शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन येथे कोविंड लसीकरण केंद्र पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात यावे अशी विनंती तांबे यांनी पुणे मनपा च्या आयुक्तांना केली आहे.