Pune News : वडगाव मावळ तालुक्यातील महिलेची चक्क कोर्ट ‘मॅनेज’ करून केसचा ‘निकाल’ लावण्याची भाषा; 2,50,000 रूपयांची लाच घेणारी महिला अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, संपुर्ण जिल्हयात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  थेट कोर्ट मॅनेज करून त्या केसचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देतो असे सांगून अडीच लाखाच्या लाचेची मागणी करून 2.5 लाखाची लाच घेणार्‍या महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. महिलेने चक्क कोर्ट मॅनेज करून केसचा निकाल लावण्याची भाषा करून अडीच लाखाची लाच घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने महिलेला अटक केली आहे. न्यायालयाने तिला 20 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शुभावरी भालचंद्र गायकवाड (29, रा. तळेगांव, ता. मावळ, जि. पुणे – खासगी व्यक्ती) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तक्रारदार यांची वडगांव मावळ कोर्टात केस प्रलंबित आहे. कोर्ट मॅनेज करून त्या केसचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावून देतो असे सांगून शुभावरी गायकवाड हिने अडीच लाखाच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर याप्रकरणी तक्रादाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारीची दि. 8 आणि 9 जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये महिला आरोपी ही लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुण्याचे अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने महिलेला लाच स्विकारताना बुधवारी अटक केली. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिला 20 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उप अधीक्षक सीमा मेहेंदळे करीत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे संपुर्ण जिल्हयात खळबळ उडाली आहे.