Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा हस्तगत

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे़
खेड बस स्थानकावर दोघांकडून ४ पिस्तुले व ८ काडतुसे असा १ लाख ७४ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

प्रविण ऊर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ (वय २८, रा़ वाळद, ता़ खेड), निलेश ऊर्फ दादा राजेंद्र वांझरे (वय २४, रा़ वांझरवाडी, ता़ दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राज्यात सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु आहेत़ काल सायंकाळी प्रचार संपला असून उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे़ त्यामुळे निवडणुका असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सर्वांना सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पेट्रोलिंग सुरु केले होते.

गुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना दोघे जण खेड बसस्टँडवर पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली़ त्याबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांचे सहकारी खेड बसस्टँडवर पोहचले़ त्यांनी तेथे संशयास्पद वावरणाºया दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली़ त्यांची अंगझडती घेतली असता दोघांचा कमरेला प्रत्येकी २ असे देशी बनावटीचे ४ पिस्तुल व त्यामध्ये प्रत्येकी २ काडतुसे असे एकूण ८ काडतुसे आढळून आली़ दोघांनाही अटक करुन खेड पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट, सहायक निरीक्षक अमोल गोरे, हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, अक्षय जावळे, दत्तात्रय जगताप, शब्बीर पठाण, विद्याधर निच्चीत मुकुंद आयचित, प्रमोद नवले, सागर चंद्रशेखर, प्रसन्न घाडगे यांच्या पथकाने केली आहे़