Pune News : अखेर हडपसरमधील लोहिया उद्याने नागरिकांसाठी खुले, पहिल्याच दिवशी चिमुकल्यांनी खेळांमध्ये हुंदडण्याचा घेतला मनसोक्त आनंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली उद्याने दिवाळीच्या दरम्यान उघडली. मात्र, पुन्हा कोरोनाचा ज्वर वाढल्याने उद्याने अल्पावधितच बंद करावी लागली. त्यानंतर मागिल 25 जानेवारी रोजी उद्याने खुली करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हडपसरमधील डॉ. राम मनोहर लोहिया नागरिकांसाठी खुले झाले नाही. याविषयी वृत्त प्रसिद्ध होताच अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन शनिवारी (दि. 30) रोजी सकाळी 6 वाजता उद्यान खुले केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

तब्बल दहा महिन्यानंतर उद्याने उघडण्यास अखेर मुहूर्त मिळाला. हडपसरमधील (मगरपट्टा चौक) उद्यानामध्ये पहिल्याच दिवशी चिमुकल्यांनी उद्यानामधील खेळणीचा चिमुकल्यांनी मनसोक्त आनंद घेतला. तसेच तरुण-तरुणींनीही फुलझाडे आणि लॉनवर मोबाईलमध्ये छबी टिपण्याची संधी साधली. तरुणाईबरोबर ज्येष्ठ नागरिकांनीही आज उद्यानातील वॉकिंग ट्रॅकवर सफर केली. उद्यान व्यवस्थापनाने स्वच्छतागृह आणि उद्यानाची स्वच्छता ठेवली असल्याचे नागरिकांकडून बोलले जात होते.

कोरोनाचा ज्वर कमी झाला आहे म्हणून उद्याने नागरिकांसाठी खुली केली आहेत. मात्र, कोरोना अद्याप संपलेला नाही, त्यामुळे नागरिकांना तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, याचीसुद्धा खबरदारी घेतली पाहिजे, ही काळाची गरज आहे. सेल्फ पोलिसिंग तसे सेल्फ डॉक्टर बनण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रथमोपचार प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे, असे डॉ. गणेश राख यांनी सांगितले.

शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार त्यांची अभ्यासाची तयारी सुरू झाली आहे. इतरही वर्गांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होईल. त्यानुसार परीक्षा होतील, त्यामुळे प्रत्येकाने अभ्यासाला लागले पाहिजे. उद्यानामध्ये हुंदडणे, फिरणे यासाठी येण्याऐवजी अभ्यास करण्यासाठी येऊन वेळ सत्कारणी लावला पाहिजे, असा सल्ला ॲड. लक्ष्मी माने यांनी दिला आहे.