Pune News : लोणी काळभोर, लोणीकंद, हवेली पोलीस ठाण्यांचा 21 फेब्रुवारीपासून पुणे आयुक्तालयामध्ये समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरानजिकच्या लोणी काळभोर, लोणीकंद आणि हवेली या तीन पोलीस ठाण्यांचा समावेश 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून (दि. 21 फेब्रुवारी) ग्रामीण पोलिस दलातून शहर पोलीस आयुक्तालयामध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर जिल्हा पोलीस दलात उरुळी कांचन पोलीस ठाणे नव्याने निर्माण होणार आहे.

शहर पोलीस दलातील हडपसर, चंदननगर व चतुःश्रुंगीसह शहर पोलीस दलातील पाचहून अधिक पोलीस ठाण्याचे विभाजन करुन, नव्याने काही पोलीस ठाण्याची निर्मितीही करण्याबाबतची अंमलबजावणी होणार आहे. लोणी काळभोर, लोणीकंद आणि हवेली या तीन पोलिस ठाण्यांचे शहर पोलिसांकडे हस्तांतर 21 फेब्रुवारीपासूनच होणार असल्याच्या वृत्तास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

देशमुख यांनी रविवारी (दि. 14) रात्री अचानक लोणीकंद पोलीस ठाण्यातील 58 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या एकाचवेळी केल्या आहेत. त्या सर्वांना 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपूर्वी सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. पुणे शहर पोलीस दलातील कर्मचारी या पोलीस ठाण्याचा चार्ज त्यानंतर घेतील. लोणीकंद पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्याप्रमाणेच लोणी काळभोर व हवेली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचे अर्ज यापूर्वीच भरुन घेतले आहेत.

गृहविभागाकडून लोणी काळभोर व हवेली पोलीस ठाण्याबाबतच्या निर्णयाची वाट पहात असून, दोन्ही पोलीस ठाण्याबाबतचा आदेशही पुढील एकदोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. गृहविभागाच्या आदेशानंतरच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा कारभार शहर पोलिसांकडे सोपविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या सर्व प्रक्रियेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनीधी व पोलिस दलातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱी यांची संयुक्त बैठक तीन जानेवारीला मंत्रालयात झाली होती. या बैठकीत खुद्द अजित पवार यांनी सहा पोलीस ठाण्याचे विभाजन करण्याबरोबरच, लोणी काळभोर व लोणीकंद व हवेली पोलीस ठाण्याचा कांही भाग शहर पोलिसात सामाविष्ट करण्याबाहतचे आदेश दिले होते. यामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष या आदेशाच्या अंमलबजावणीकडे होते.