Pune News : वाघोलीत सापडलेल्या मानवी सांगाड्याची ओळख पटविण्यात लोणीकंद पोलीस यशस्वी

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली येथील हाॅटेल कावेरीच्या पाठीमागे सापडलेल्या मानवी सांगाड्याची ओळख पटविण्यात लोणीकंद पोलीस यशस्वी झाले असून, ही व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात वादळी पावसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने येथील ओढ्यास पूर आला होता. त्या पुरामध्ये अनेक मोटारसायकली अंधारात वाहून गेल्या होत्या. दिनांक 1 डिसेंबर रोजी वाघोली गावच्या हद्दीत हॉटेल कावेरी पाठीमागे असणाऱ्या ओढ्यात एक सुझुकी कंपनीची एक्सेस मोटार सायकल (क्र. MH 12 FQ 6172) व गाडीपासून 50 मीटर अंतरावर मानवी कवटी तसेच अर्धवट सांगाडा व कपडे आढळले. यावर गुन्हे शाेध पथकाने घटनास्थळी मिळालेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे व ऋषिकेश व्यवहारे यांनी तात्काळ गाडीबाबत अभिलेख चेक केला असता, सदर गाडीच्या मूळ मालकाबाबत माहिती मिळवली. परंतु त्याचा राहण्याचा पत्ता अपुरा असल्याने त्यास शोधणे अवघड गेले. परंतु 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर गाडी मालक महेश विठ्ठल दारवटकर (रा. अष्टविनायक टेरेस सोसायटी, सुखसागरनगर, पुणे) यांच्या घरी पोलीस पोहाेचले, परंतु त्यांनी सदर गाडी त्यांचा कामगार विशाल जाधव (रा. आकुर्डी) यास विकल्याचे सांगितले. म्हणून तात्काळ आकुर्डी पुणे येथे जाऊन विशाल जाधव याच्याकडे चौकशी केली असता, त्याने ही गाडी त्याचा मित्र अजय इंदू अंधारे (वय 23, रा. वाघोली, पुणे) याला दररोज दैनंदिन कामासाठी दिल्याचे सांगितले. परंतु गेल्या दीड महिन्यापासून अजय अंधारे याच्याशी काहीच संपर्क झाला नसून त्याचा फोन बंद असून, त्याने गाडीदेखील परत न दिल्याचे विशाल जाधव याने सांगितले. त्याच्याकडून मिळालेल्या मोबाईल नंबरवरून अजय याची बहीण कल्याणी छगन अंधारे (रा. ऐश्वर्या सोसायटी, रायसोनी कॉलेजजवळ, वाघोली, पुणे) यांच्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली, तेव्हा तिचा भाऊ अजय अंधारे हा लॉकडाउननंतर गणपती उत्सवादरम्यान उस्मानाबाद येथून आला होता व त्याच्या मित्रांसोबत राहत होता. तसेच मागील 2 महिन्यांपासून अजय संपर्कातदेखील नव्हता, असे तिने सांगितले.

म्हणून अजयचा मित्र अभिषेक पाटील याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सांगितले की, दिनांक 14 आॅक्टाेबर 2020 रोजी रात्री 10 वाजता अजय अंधारे याचा त्याला फोन आला व मी स्कूटीवरून घरी येत असून, खूप पाऊस आहे, असे अजयने फोनवर सांगितले. त्यानंतर त्याचा फोन आला नाही व अजय अंधारे हा रुमवरदेखील आला नाही, असे अभिषेकने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांची खात्री झाली की, हा अजय अंधारे हीच व्यक्ती असावी. म्हणून अर्धवट सापळा व कवटी वैद्यकीय तपासणी कामी ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आली. तसेच घटनास्थळी मिळालेले कपडे व कवटीमध्ये असणाऱ्या दुहेरी दातांमुळे व जलद गतीने मोटारसायकलबाबत मिळवलेल्या माहितीनुसार अर्धवट मिळालेल्या सापळ्याची ओळख पटविण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे.

ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सई भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखालीसहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सागर कोंढाळकर, योगेश भंडारे यांनी केली आहे.