Pune News : महापालिकेत बनावट लायसन्सचा वापर करून कोट्यवधींची कामे ?, अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचारी-अधिकारी संशयाच्या फेऱ्यात, खडकी पोलिसांकडून तपास सुरू

पुणे – लेबर कॉन्ट्रॅक्टचे बनावट लायसन्स वापरून एका ठेकेदाराने महापालिकेची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. विशेष असे की अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातील एक कर्मचारी व अधिकार्‍यानेच अनेक बनावट लायसन्स तयार करून दिली असून त्यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे महापालिकेच्यावतीने झाडणकाम, वाहन चालक, अतिक्रमण, सुरक्षा रक्षक व अन्य कामांसाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमण्यात येतात. निविदा मागवून लायसन्सधारक लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून हे मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले जाते. महापालिकेकडून वर्षानुवर्षे या धर्तीवर सेवा घेण्यात येत आहे. दरम्यान, नुकतेच एका क्षेत्रिय कार्यालयाच्या झाडणकामाची निविदा मिळालेल्या एका लेबर कॉन्ट्रॅक्टरने महापालिकेला सादर केलेले लायसन्स बनावट असल्याची तक्रार खडकी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. हे लायसन्स अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातील एका कर्मचार्‍याने त्यांच्याच विभागातील अधिकार्‍याची स्वाक्षरी व शिक्के वापरून परस्पर दिले आहे. याच ठेकेदाराला नव्हे तर महापालिकेकडे काम करणार्‍या जवळपास १० ठेकेदारांना अशाच पद्धतीने शासनाची आर्थिक फसवणूक करून हे लायसन्स देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केल्याने पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे.

खडकी पोलिसांनी नुकतेच महापालिकेच्या झोनल उपायुक्त कार्यालयाला नोटीस पाठविली असून त्यांनी सन २०१८ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत या झोनल कार्यालयामार्फत जाहिर करण्यात आलेले टेंडर्स व कामांची यादी, सदर टेंडरच्या अनुषंगाने ज्या लेबर कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या त्यांचे लायसन्स नंबर, नाव, पत्ते व प्रमाणपत्रांची प्रत आणि सदर टेंडर ज्या कंत्राटदारांना प्राप्त झाले त्यांचे कंत्राट लायसन्स नंबर, नाव, पत्ते व प्रमाणपत्रांची प्रत मागविली आहे.

यासंदर्भातील माहिती अशी की,  निविदेत सहभागी होणार्‍या कंत्राटदारांकडे अधिकृत परवाना आवश्यक आहे. लेबर लायसन्ससोबतच अन्य कागदपत्रही निविदा भरताना आणि पुढे करार करताना घेतली जातात. विशेष असे की यापैकी बहुतांश परवाने हे शासनाच्या विविध विभागांच्यावतीने देण्यात येतात. महापालिकेचे अधिकारीही केवळ शासकिय शिक्के आणि ठेकेदारांनी दिलेले प्रतिज्ञापत्र यावर विश्‍वास ठेवून सर्व प्रक्रिया पार पाडत असते. ठेकेदारांनी सादर केलेल्या परवान्यांची खातरजमा करण्याची तशी कुठलिही व्यवस्था महापालिकेकडे नाही. किंबहुना शासकिय कार्यालये अथवा बँकांमध्ये जावून प्रत्येक कागदपत्राची खातरजमा करणे तांत्रिकदृष्टया वेळखाउ असल्याने केवळ प्रतिज्ञापत्रावरच विश्‍वास दाखविण्यात येतो. त्यामुळे बनावट लायसन्स अथवा अन्य कागदपत्रे सादर केल्याची केसनिहाय तक्रार आली तरच प्रकरणं समोर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.