Pune News : महात्मा गांधीचे विचार चमत्कार नव्हे हा अनुभवण्याचा, आचारणाचा विषय – डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा गांधी यांचा मोहनदास करमचंद गांधीपासून सुरू झालेला प्रवास हा महात्मा पर्यंत पोहचला. या प्रवासात एक गोष्ट स्पष्ट जावणते की महात्मा हा उशिरा जन्माला आलेला आहे. हा संपूर्ण प्रवास जाणिवांचा, विचारांचा, अनुभवांचा प्रवास आहे. आजच्या वातावरणात देशात परदेशात कुठेही गांधींच्या अहिंसेच्या विचारांची दखल ही शांतता देऊन जाते. त्यामुळे महात्मा गांधींचे विचार हा चमत्कार नव्हे तर तो अनुभवण्याचा, आचारणाचा विषय आहे, असे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपास सबनीस यांनी आज येथे सांगितले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने म. गांधींच्या ७3 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने “महात्मा गांधी विचार व छायाचित्र प्रदर्शन” सारसबागेजवळच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनात भरवले आहे. या प्रदर्शनाचे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार होते. प्रमुख पाहुणे आमदार संग्राम थोपटे उपस्थित होते. म. गांधी विचार दर्शन प्रदर्शनाचे मुख्य आयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, विरोधी पक्षनेते आबा बागूल, नगरसेवक अविनाश बागवे, शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सोनाली मारणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके, माजी नगरसेवक संजय बालगुडे, विरेंद्र किराड. नीता रजपूत, ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, सचिन आडेकर आणि रमेश अय्यर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

डॉ. सबनीस म्हणाले, अहिंसेच्या मार्गाने देशाला महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसेच्या विचाराने प्रबळ सत्ताधा-यांवर मात करता येते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या विचारात येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर, भगवान महावीर, गौतम बुद्ध यांच्यासारख्या सर्व संतांच्या विचारांचे सार आहे. त्यामुळे कुठेही हिंसा झाली की गांधींच्या विचारांचे स्मरण केले जाते. म्हणूनच महात्मा गांधीजीचे विचार हे सातत्याने लोकांच्याच, जनमानसात रूजवणे, तरूण पिढीसमोर मांडणे गरजेचे आहे. काँग्रेसची आजची जी अवस्था आहे ती कायम टिकणारी नाही. महात्मा गांधींच्या विचारामध्ये इतकी ताकद आहे की, हे विचार लोकांपर्यंत नेण्याचे माध्यम असलेल्या काँग्रेसला बळ देऊ शकतात. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचे अवलोकन करून त्याचे अचरण करणे गरजेचे आहे.

उल्हास पवार म्हणाले, आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात सहजपणे जगात कुठेही बोलू शकतो, जाऊ येऊ शकतो. पण जेव्हा संपर्काची काहीच साधने देशात आणि जगातील अनेक देशात नव्हती तेव्हा गांधींचे विचार जगात पोचलेले बघायला मिळतात. हे विचार माणसांनी सातत्याने बोलून बोलून जगभर नेले आहेत. मार्क्सवादी विचारांचा देश असलेल्या व्हिएटनामलाही महात्मा गांधींच्या विचारामुळेच सतत प्रेरणा, स्फूर्ती मिळल्याने त्यांना साडेसतरा वर्षानंतर अमेरिकेवर विजय मिळवला असे त्यांचे राष्ट्रप्रमुख हो मि चिंग यांनीच जाहीरपणे मान्य केले आहे. जगात बर्नाड शॉपासून अनेक मोठ्या व्यक्तींवर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव पडलेला बघायला मिळतो. गांधींच्यातील खरा महात्मा आज आपल्या देशातील जनतेला सांगून सत्तेसाठी महात्मा गांधींचे नाव घेणा-या बेगडी नेत्यांचे पोलखोल काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावी असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

म. गांधी विचार दर्शन प्रदर्शनाचे मुख्य आयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, टिळकांच्या मृत्युनंतर स्वातंत्र्य लढ्याची सूत्र गांधीजींकडे आली. त्यांनी ब्रिटीशांविरूद्ध लेखन, असहकार आंदोलन, मीठाचा सत्याग्रह ते ब्रिटीश सत्ताधा-यांना चले जाव असे निक्षून सांगण्यापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर नेतृत्व करत ते ख-या अर्थाने स्वातंत्र्य लढ्याचे नायक झाले. आज जगातील सत्तरपेक्षा जास्त देशात महात्मा गांधींचे पुतळे आहेत. त्यांच्या विचारांची गरज आज देशालाच नव्हे तर जगाला आहे. त्यामुळे त्यांचे विचार लोकांच्यात टिकून राहिले पाहिजेत यासाठीच हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे.

या प्रदर्शनात महात्मा गांधींच्या जीवनातील विविध प्रसंगांची साठ छायाचित्रे लावण्यात आलेली आहेत. फुटबॉल टीमसोबत किंवा त्यावेळच्या सैनिक, वैद्यकीय सेवेतील सैनिक यांच्या सोबतचीही दुर्मिळ छायाचित्रे यात बघायला मिळतात. महात्मा गांधींच्या आचार विचारांचे दर्शन हे प्रदर्शन बघताना होते. हे प्रदर्शन शनिवार नागरीकांसाठी ठाकरे कलादालनात खुले राहणार आहे.