Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! रविंद्र बर्‍हाटेच्या साथीदारांना आश्रय देणार्‍या तसेच मदत करणार्‍या तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यातील रविंद्र बर्‍हाटे टोळीच्या बहुचर्चित मोक्काच्या गुन्ह्यामध्ये आरोपींना आश्रय आणि मदत केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामुळे आश्रय देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शंकर शेमटया वसावे (वय 28, नंदुरबार), संदीप पोपट घाडगे (वय 34) व सूरज सिद्धेश्वर गायकवाड (वय 26, रा. फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

जमीनीचा ताबा घेतल्याप्रकरीण रविंद्र बर्‍हाटे यांच्यासह 13 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. या गुन्ह्यात अद्याप देखील रविंद्र बर्‍हाटे व देवेंद्र जैन फरार आहेत. तर 6 जणांना अटक केली होती. तर काही दिवसांपूर्वी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची माहिती घेतल्यानंतर ते इतक्या दिवस कुठे होते, त्यांना मदत तसेच आश्रय कोणी दिला, याची माहिती पोलीस गोळा करत होते. त्यावेळी या तिघांनी 5 जणांना आश्रय आणि मदत दिली असल्याचे समजले. त्यानुसार या तिघांना गंभीर गुन्ह्यातील आरोपीना सहाय्य केल्याने गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

मोक्काचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर आश्रय देणाऱ्यांना देखील 5 वर्ष कारावास व 5 लाख रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे गुन्ह्यात मदत केल्यानंतर कारवाई होण्याची शक्यता असते.