Pune News : आमदार सुनील शेळके यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं भासवून फसवणूक, तरूणाला अटक अन् एक दिवसाची कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  मावळातील आमदार सुनील शेळके यांचा स्वीय सहायक असल्याचे भासवून त्यांच्यामार्फत अन्नधान्याचे किट मिळवून देण्याचे सांगत रिक्षाचालकाकडून पैसे उकळणाऱ्यास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. भामट्याने संबंधित रिक्षाचालकाकडू साडे पाच हजार रुपये घेतले होते.

अनिरुद्ध बाबासाहेब टेमकर (वय 31, रा. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे. याबाबत रिक्षाचालक संदीप शशिकांत काळे (वय 30, रा. दांडेकर पूल) यांनी फिर्याद दिली आहे. 16 मे 2020 रोजी ही घटना घडली. संदीप यांची अनिरुद्ध याच्याशी फेसबुकवरून ओळख झाली. त्यावेळी, अनिरुद्ध याने आपण मावळचे आमदार सुनील शेळके यांचा स्वीय सहायक असून अन्न-धान्याचे किट मिळवून देतो, असे खोटे सांगितले. त्याबदल्यात त्याने संदीप यांच्याकडून फोनपेद्वारे साडे पाच हजार रुपये घेतले. मात्र, किट दिले नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीने या प्रकारे आणखी कोणास फसविले आहे का? हा गुन्हा त्याने कोणाच्या सांगण्यावरून केला? आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का? तसेच गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एन. आर. केंचे करीत आहेत.