Pune News : मुळशी तालुक्यातील मंगेश पालवे टोळीवर मोक्का, ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टोळीचे वर्चस्व व आर्थिक प्राप्तीसाठी संघटितपणे गुन्हे करणार्‍या मुळशी तालुक्यातील रिहे येथील मंगेश नामदेव पालवे याच्यासह त्याच्या 3 साथीदारावर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ही कारवाई केली आहे.

1 फेब्रुवारी 2021 रोजी रजत प्रकाश भोसले (वय 24, रा. रिहे) याला मंगेश नामदेव पालवे, किरण सुरेश माकर (रा. लांडगेवाडी, घोटावडे), ऋषिकेश दत्तात्रय पारखे (रा. गंगारामवाडी, माण, विक्रम तातेराव शिंदे (रा. गोडांबेवाडी, नंबर 2) यांनी शिविगाळ करीत दमदाटी केली होती. यावेळी या चौघांनी ‘तुझा भाऊ पिल्या लय मोठा डॉन झाला आहे, आम्हांला नडतो, शिव्या देतो, तुम्हा दोघांना लय माज आला आहे. तू पण लय मोठा डॉन झालाय, आमच्या बरोबर फिरत नाही’ असे म्हणून त्याच्या डोक्यावर लोखंडी कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. हा गुन्हा पौड पोलिस ठाण्यात त्यावेळी दाखल करण्यात आला होता.

यासह मंगेश पालवे याच्यावर पौड व पिंपरी पोलिस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, गर्दी तसेच जमाव जमवून गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे व त्याची विक्री करणे असेे सहा गुन्हे दाखल आहेत. यामुळे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांनी पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविलेल्या मोक्काच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली.