Pune News : पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराच्या खून प्रकरणात 16 जणांवर मोक्का

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराच्या खून प्रकरणात पोलिसांनी मोक्कानुसार
(महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाई केली असून, यात 16 जणांवर मोक्का लावला आहे. येरवडा येथे नितीन शिवाजी कसबे याचा खून झाला होता. पूर्व विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी हे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात टोळीप्रमुख आकाश वंसत कनचिले व कुणाल जाधव, अभिषेक उर्फ अभय पाटील, अक्षय सोनवणे, आकाश मिरे, अर्जुन म्हस्के, राजवीर सौतरा, चेतन भालेराव, आकाश सपकाळ, निलेश पुंड, गणेश आडसुळ, लक्ष्मण गजरमल, रिपेन्स चिनाप्पा, प्रज्वल कदम, ओंकार सोनवणे, सौरभ डौलारे अशा सोळा जणांना या खून प्रकरणात अटक केली होती.

कनचिले याच्या सांगण्यावरून टोळीच्या वर्चस्वातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले. कनचिले याने टोळी करून आर्थिक फायदा मिळविण्यासाठी संघटितपणे गुन्हे करत होता. या टोळीतील आरोपींवर खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे टोळीवर मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्फत अप्पर आयुक्त चव्हाण यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार त्यांनी कनचिले व त्याच्या १५ साथीदारांवर मोक्कानुसार कारवाई केली आहे. अधिक तपास सहायक आयुक्त किशोर जाधव हे करत आहेत.