Pune News : खासदार बापट यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील कोरोना योद्ध्यांच्या हस्ते शुक्रवारी खासदार गिरीश बापट यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमादरम्यान कोरोना योद्ध्यांचा खास गौरव करण्यात आला.

त्यामध्ये डॉ. चंद्रभान पाटील, पोलीस अधिकारी हेमंत धायगुडे, समाजसेवक पंडित धुमाळ, पत्रकार प्रशांत आहेर, अमोल कविटकर, धनश्री बनकर, नितीन पठारे, सलीम शेख, जीवराज सणस यांचा समावेश होता माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, ज्येष्ठ पत्रकार विकास वाळुंजकर व भाजपाचे सरचिटणीस राजेश पांडे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना खा बापट म्हणाले की, रुग्णालय कर्मचारी, पोलीस, स्मशानातील कामगार, तसेच डॉक्टर, परिचारिका या सर्वांनी जीवाचे रान करून कोरोना संकटांशी सामना केला. रक्तपेढीतील सहकाऱ्यांनीही याकामी मदत केली. अशा योद्ध्यांचे कौतुक करणे. या उद्देशाने आज त्यांचा गौरव करण्यात आला. पत्रकारांनीही घरादाराची पर्वा न करता दिवस-रात्र कष्ट करून माहितीचे आदान प्रदान करण्याचे खूप मोठे काम केले.

त्यांच्या ऋणातून मुक्त होणे शक्य नसले, तरी त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी पत्रकार संघाला 51 हजार रुपयांची देणगी देत आहे. यावेळी काही पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रकाश भोईटे, चंद्रकांत हंचाटे, जितेंद्र अष्टेकर, महेंद्र बडदे, शैलेश काळे, स्वप्निल बापट, विनायक कुलकर्णी, उमेश शेळके आदींचा समावेश होता. यावेळी खा. बापट यांच्या कार्यअहवालाचे कोरोना योद्ध्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या अहवालामध्ये बापट यांनी कोरोना महामारीच्या काळात केलेल्या कार्याचा आढावा सादर करण्यात आला आहे. खा. गिरीश बापट यांनी स्वतः या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पत्रकार उमेश शेळके यांनी आभार मानले. यावेळी बापट यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांचा ही गौरव करण्यात आला.