Pune News : मंगळवार पेठेत महावितरणच्या महिला कर्मचार्‍यास मीटर रूममध्येच कोंडले, एकजण अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   आलंकार परिसरात महावितरणचे पथक गेल्यानंतर त्या पथकावर हल्ला झाल्याचे प्रकरण समोर असतानाच मंगळवार पेठ भागात ही विजबिल न भरल्याने विद्युत कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला एकाने मीटर रूममध्येच कोंडल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

सलीम बशीर सय्यद (वय 45, रा. सुखनिवास एस आर ए बिल्डींग, मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महावितरणचे महिला कर्मचारी माधुरी सुनील कुलसुंगे (वय 28) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सध्या थकीत बिल जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी घरोघरी हे कर्मचारी जात आहेत. दरम्यान सय्यद याच्याकडे देखील 11 हजार 481 रुपये वीजबिल थकले आहे. त्यामुळे फिर्यादी या विद्युत कनेक्शन कट करण्यासाठी मंगळवार पेठेतील आरोपी यांच्या मीटर रूम मध्ये गेल्या होत्या. फिर्यादी यांनी मीटर कट केल्याने आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेला आणि “आमची कट केलेली लाईट चालू कर नाहीतर मी तुला येथेच रूममध्ये कोंडून ठेवेन” असे म्हणत शिवीगाळ केली आणि मीटर रूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून घेत त्यांना कोंडून ठेवले. फिर्यादी यांनी कार्यालयातील सहकाऱ्याला फोन करून ही माहिती देत त्यांना बोलावुन घेतले. त्यानंतर त्यांची सुटका केली. माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत.