Pune News : पुणे जिल्ह्यात महावितरणची 1329 कोटी रुपयांची थकबाकी, थकबाकी भरण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व सार्वजनिक सेवा वर्गवारीमध्ये गेल्या तीन महिन्यांत 9 लाख 9 हजार थकबाकीदारांची व 399 कोटी 41 लाख रुपये थकबाकीची रक्कम वाढली आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात 23 लाख 81 हजार 400 वीजग्राहकांकडे 1329 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीमुळे महावितरणवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी चालू वीजबिलांसह थकबाकीचा भरणा करावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.

कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील उच्च व लघुदाब ग्राहकांना चालू वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी डाऊन पेमेंट करण्याची गरज नाही. तसेच ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या सुरु आहे मात्र वीजबिल थकीत आहे अशा तसेच तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार ग्राहकांनी 30 टक्के डाऊन पेमेंट करून सुलभ हप्त्यांच्या योजनेत सहभाग घेतल्यास त्यांना सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. सोबतच खंडित झालेली वीजजोडणी पुनर्जोडणी शुल्क भरून किंवा सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाल्यास नवीन वीजजोडणी घेण्याची सोय आहे.

वीजबिल भरणा केंद्रासोबतच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. यासोबतच ‘लॉकडाऊन’मधील वीजबिलांबाबत शंका असल्यास त्याची घरबसल्या पडताळणी किंवा तपशील हा https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे.