Pune News : मिळकतकरामध्ये 11 % वाढीचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव, स्थायी समितीची विशेष सभा घेणार अंतिम निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  महापालिकेच्या (PMC) मिळकतकरामध्ये सन २०२१- २२ या आर्थिक वर्षासाठी ११ टक्के करवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडुन सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर स्थायी समितीची खास सभा होणार आहे.

महापालिका प्रशासाने उत्पन्नात वाढ होण्यासाठी सर्वसाधारण करामध्ये ५.५ टक्के. सफाई करामध्ये ३.५ टक्के आणि जलनि:सारण करामध्ये २ टक्के दरवाढीचा प्रस्ताव सुचवला आहे. यामुळे मिळकत करामधून २१६४ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. महापालिकेच्या हद्दीच २३ गावांचा समावेश होणार असल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात ११० कोटींची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. महापालिकेला २०२१-२२ यावर्षामध्ये २४०० कोटीें उत्पन्न अपेक्षित धरण्यात?आले असल्याचे महापालिका आयुक्त यांनी स्थायी समितीला दिलेल्या प्रस्तावात नमुद करण्यात आले आहे.

मिळकतकराची रक्कम १ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ अखेर संपुर्ण कर भराणाऱ्या मिळकतधारकांना करामध्ये देण्यात येणारी ५ टक्के अथवा १० टक्के सवलत कायम ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर गांडूळखत, खत प्रकल्प, सोलर प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग या योजनांसाठी देण्यात येणारी सवलत कायम राहणार आहे. वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचे पत्नी किंवा माता यांना करात देण्यात येणारी सवलत कायम राहणार आहे. राष्ट्रपतीपदक देण्यात आलेल्या स्वत: राहत असलेल्या एका मिळकतीला सामन्य करात सुट सुध्दा देण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे महापालिकेचे २०२१-२२ या वर्षीचे अंदाजपत्रक २९ जानेवारीला सादर करणार आहेत. तसे पत्र आज त्यांनी स्थायी समितीला दिले आहे. मिळकतकरातील ११ टक्के वाढ करूनच आयुक्त अंदाजपत्रक सादर करणार आहेत. मिळकतकर वाढीबाबत स्थायी समितीच्या विशेष सभेत होणार्‍या निर्णयाचे प्रतिबिंब स्थायी समिती अध्यक्षांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात दिसेल. पुढीलवर्षी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने सत्ताधारी भाजप मिळकतकरामध्ये वाढ करणार? याची उत्सुकता मात्र वाढली आहे.