Pune News : 23 गावांच्या निर्णयामुळे महापालिका आयुक्तांचे अंदाजपत्रक या वर्षी जानेवारीच्या अखेरीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  महापालिकेच्या (PMC) पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांकडून दरवर्षी 15 ते 17 जानेवारी दरम्यान, अंदाजपत्रक सादर केले जाते. मात्र,या वर्षी प्रशासनाकडून अंदाजपत्रक 29 जानेवारी रोजी सादर कराण्यात येणार असल्याने आयुक्तांकडून त्याबाबतच्या मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या 23 गावांच्या निर्णयामुळे महापालिका आयुक्तांचे अंदाजपत्रक या वर्षी जानेवारी अखेरीस स्थायी समितीला सादर होणार आहे.

महापालिकेचे 2020-21 या आर्थिक वर्षांचे पूर्ण अंदाजपत्रकात करोनाच्या संकटात गेले आहे. या कालावधीत महापालिकेचे उत्पन्न लक्षणीय स्वरूपात घटल्याने या मार्च अखेर पर्यंत पालिकेकडून या आर्थिक वर्षात केवळ 20 ते 25 टक्केच विकासकामे केली जाणार आहेत. त्यातच, 2019-20 या आर्थिक वर्षाच्या सुमारे 700 कोटींच्या बिलांची थकबाकीही पालिकेकडून 2020-21 च्या अंदाजपत्रकातून देण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या जमाखर्चा ताळमेळ बघता आयुक्तांच्या अंदाजपत्रकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, पालिका हद्दीत नव्याने 23 गावे समाविष्ट होत असल्याने या गावांच्या विकासासाठी आयुक्त किती निधी देणार याकडेही या गावांचे लक्ष लागले आहे.

राज्यशासनाने महापालिका हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्याची अधिसूचना 23 डिसेंबर रोजी जाहीर केली आहे. त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या असून 23 जानेवारी पर्यंत मुदत आहे. त्यामुळे, अंदाजपत्रक सादर झाले आणि त्यानंतर 23 गावे आल्यास त्यांच्यासाठी निधीची तरतूद करणे अडचणीचे होईल. त्यामुळे आयुक्तांकडून स्थायी समितीकडे 29 जानेवारी पर्यतची मुदतवाढ मागण्यात आली होती. त्यास समितीने मान्यता दिली आहे.