Pune News : महापालिकेने ‘पाणीपट्टी’ थकबाकीकडे वळविला मोर्चा; दोन दिवसांत 2 कोटी ‘वसूल’

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात अभय योजना राबवून तसेच थकबाकीदारांच्या मिळकतींच्या सातबारावर बोजा चढवून मोठ्याप्रमाणावर थकबाकी वसुली करणाऱ्या महापालिकेने आता पाणी पट्टी थकबाकी वसुलीकडे मोर्चा वळविला आहे. पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी नोटीसेस आणि कारवाईची मोहीम उघडत दोनच दिवसांत दोन कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

शहरात सुमारे 40 हजार मिळकतींना मिटरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने काही मोठ्या सोसायट्या असल्यातरी बहुतांशी व्यावसायिक मिळकती आहेत. तसेच पोलीस, बीएसएनएल, रेल्वे, शासकीय कार्यालये, महावितरण यासारख्या शासकीय कार्यालयांचाही यामध्ये समावेश आहे.

या मिळकतींकडे गेल्या अनेक वर्षांपासून 500 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. यामधील काही प्रकरणे चुकीच्या नोंदी, चुकीची आकारणी आशा विविध कारणांमुळेही वसुली मध्ये अडचणी आहेत.

परंतु कुठल्याच तांत्रिक चुका नसतानाही थकबाकीची रक्कम मोठी आहे. यापार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विभागाने अशा मिळकतीना नोटिसेस पाठवण्यास सुरुवात केली असून ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा बंद करायचा इशारा दिला आहे. ही मात्रा उपयोगी पडत असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या दोन दिवसांत दोन कोटी रुपये थकबाकी वसूल झाली आहे.

यासंदर्भात बोलताना पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर म्हणाले, की पाणी पट्टी थकबाकीची रक्कम मोठी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येत असून कारवाईची संख्या वाढवण्यात येत आहे. मागील दोन दिवसांत 2 कोटी रुपये थकबाकी वसूल करण्यात आली आहे.