Pune News : अनधिकृत बांधकामे करणाऱ्या ‘मालक’ विकसकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ‘महापालिकेची’ विशेष मोहीम सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोंढवा खुर्द परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांभोवती महापालिकेने फास आवळायला सुरुवात केली आहे. अनधिकृत बांधकाम करणारे मालक आणि विकसकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी विशेष गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

कोंढवा खुर्द परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे यापूर्वीही झाली असून नव्यानेही बांधकामे सुरू आहेत. पालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांना नोटीस देण्यात आल्या आहेत. यानंतरही बांधकामे उरकण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत त्याठिकाणी बांधकाम विभागाच्या वतीने बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात येते. मात्र अनेक ठिकाणी बांधकाम करून नागरिक राहात आहेत, तेथे बांधकामावर कारवाई करणे जवळपास अशक्य ठरते. याचा फायदा काही मंडळी उचलत असल्याने अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे. यापार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले आहे.

बांधकाम विभागाने या परिसरातील अनधिकृत बांधकामे करणारे जागा मालक आणि विकसकांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 52 अनव्ये जागा मालक आणि विकासकांवर गुन्हे दाखल करण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. याची जबाबदारी 25 अभियंत्यांवर सोपवली आहे. जागा पाहणी करणे, यापूर्वी संबंधिताना पाठवलेली नोटीस आणि केलेली कार्यवाही याची माहिती घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शयानुसार स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 11 जानेवारी पासून सुरू करण्यात आलेली ही मोहीम 31 मार्च पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकेच्या या मोहिमेमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर सुरू झाला आहे. परंतु कायदेशीर कारवाईस अडथळा करणाऱ्यांविरुद्धही प्रसंगी कायदेशीर कारवाई करण्याची तयारी ठेवत ही मोहीम राबविण्याचा चंग प्रशासनाने बांधला आहे, अशी माहिती अधिकारी सूत्रांनी दिली.