Pune News : विकास आराखड्यातील मुंढवा ते खराडी दरम्यानचा पूल महापालिकेने उभारावा, NCP चे नगरसेवक ऍड. जाधव यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  मुंढवा स.नं.९ ते १४ व खराडी स.नं. १६/४ अ या दरम्यान मुळा- मुठा नदीवर २४ मी. रुंदीचा पूल मुंढव्यातील बांधकाम व्यावसायीकांनी उभारण्याची तयारी दर्शविली होती. तो पूल त्यांच्याकडूनच बांधून घ्यावा. तर विकास आराखड्यामध्ये येथूनच जवळ असलेल्या नदीवरील पुलाचे बांधकाम महापालिकेने करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे स्थानीक नगरसेवक ऍड. भैय्यासाहेब जाधव यांनी केली आहे.

मुंढवा ते खराडी दरम्यानच्या वरिल पुलाचे काम पीपीपी तत्वावर क्रेडीट बॉंडच्या माध्यमातून करण्याबाबतचा प्रस्ताव नुकतेच स्थायी समितीमध्ये मंजुर करण्यात आला आहे. विशेष असे की, २०१७ मध्ये हाच पूल स्वखर्चाने उभारण्याची तयारी मुंढव्यातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी दाखविली होती. तसे पत्रही पीएमआरडीएला दिले होते. पुल उभारल्यानंतर पाच वर्षे देखभाल दुरूस्ती आणि त्यानंतर हा पूल महापालिकेकडे हस्तांतर करण्याची जबाबदारी संबधित व्यावसायिकाने घेतली होती. त्यानुसार पीएमआरडीएने वरिल जागेतून कलम २०५ नुसार पूलाच्या रस्त्याची आखणी करण्या बाबातचे पत्र महापालिकेला पाठविले होते. दरम्यानच्या काळात मुंढवा महापालिकेच्या हद्दीत आल्यानंतर संबधित विकसकाने पूल उभारण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कलम २०५ नुसार रस्त्याची आखणी करून स्वखर्चातून पूल उभारण्याचा प्रस्ताव ठेवला. २०१७ मध्ये शहर सुधारणा समितीपुढे आलेला व महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारा हा प्रस्ताव तत्कालीन शहर सुधारणा अध्यक्षांनी परत पाठवून दिला होता. मात्र, पुढच्याच वर्षी अर्थात २०१८ मध्ये नवीन शहर सुधारणा समिती अध्यक्षांनी त्याला मंजुरी दिली. या प्रस्तावाला विरोध करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे स्थानीक नगरसेवक ऍड. भैय्यासाहेब जाधव यांनी या प्रस्तावाचा फेरविचार दिला होता. मात्र, तो फेटाळून लावण्यात आला.

दरम्यान काल प्रशासनाने स्थायी समितीने या पुलासह दोन पुल आणि खराडी, मुंढवा परिसरातील १२ रस्ते पीपीपी तत्वावर व क्रेडीट नोट / बॉंड देउन विकसित करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बोलताना नगरसेवक ऍड. भैय्यासाहेब जाधव म्हणाले, पीपीपी तत्वावर मुंढवा ते खराडी दरम्यान पूल उभारण्याची तयारी मुंढव्यातील बांधकाम व्यावसायीकांनी दाखविली होती. हा पुल त्यांनीच उभारावा. तसेच येथून काही अंतरावर महापालिकेने विकास आराखड्यामध्ये पूलाची आखणी केली आहे. हा पूल महापालिकेने पीपीपी तत्वावर अथवा महापालिकेने स्वखर्चाने उभारावा. हे दोन्ही पूल उभे राहील्यास या परिसरातील नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्‍न मिटणार आहे. परंतू केवळ बांधकाम व्यावसायीक धार्जिणे धोरण डोळ्यासमोर ठेवून पूल उभारणे पालिका प्रशासनाची प्रतिमा मलिन करणारे ठरणारे आहे.

‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’

पुणे महापालिकेच्या २०१७ मध्ये मंजूर झालेल्या विकास आराखड्यामध्ये शहराच्या विविध भागामध्ये २०० हून अधिक डीपी रस्ते आहेत. शहरातील बहुतांश आमदार आणि नगरसेवक हे डीपी रस्ते विकसित करून त्यांच्या परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडवावा यासाठी सातत्याने महापालिका आयुक्तांकडे बैठका घेत आहेत. परंतू मागील तीन वर्षांत एखाद दुसर्‍या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पीपीपी तत्वावर रस्त्यांचा विकास करताना केवळ खराडी येथील रस्ते डोळ्यासमोर ठेवण्यात आल्याने अनेक नगरसेवक नाराजी व्यक्त करत आहेत. परंतू थेट पक्ष ‘श्रेष्ठी’ च या निर्णय प्रक्रियेत असल्याने ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ अशी केविलवाणी अवस्था झाल्याची खंत नगरसेवक व्यक्त करत आहेत.