Pune News : पालिकेने रस्ता शोधण्यासाठी दुर्बिण द्यावी ! वाहनचालकांचा संतप्त सवाल; हडपसर गाडीतळ ते गांधी चौक दरम्यानची स्थिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर महामार्गावर हडपसर गाडीतळ ते गांधी चौकादरम्यान रस्ता शोधण्यासाठी वाहनचालकांना महापालिका प्रशसानाने दुर्बिण देणे अत्यंत गरजेचे आहे. फेरीवाले, पथारीवाले, भाजीपाला, खारी-बिस्कीट, सुका-मेवा, तयार कपडे, खेळणी, अशा एक ना अनेक वस्तू विक्रेत्यांनी रस्ता व्यापला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना रस्ताच शिल्लक राहिला नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेतील हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण नेमकी कारवाई कोणावर करतो, असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

रविवारी दुपारी चार वाजल्यापासून रात्री आठवाजेपर्यंत आणि इतर दिवशी भल्या सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर खच्चून गर्दी असते. पोलीस स्टेशन आणि महापालिका क्षेत्रीय कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर आहे. वाहतूक पोलीस चौकात उभे असतात, रिक्षावाले रस्त्यात बिनदिक्कत रिक्षा उभ्या करून थांबतात, तरी त्यांच्यावर कारवाई करण्याची कोणाही पोलीस वा पालिका अधिकाऱ्याची हिम्मत होत नाही. मात्र, हेच पोलीस दुचाकीचालकांना ऐनकेन प्रकारे अडवून त्यांच्याकडून दंड वसुली मात्र इमानेइतबारे करीत असतात. एखाद्याने कायदा दाखविण्याचा प्रयत्न केला, तर लगेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यासाठी पोलीस कर्मचारी अधिकारी मागेपुढे पाहात नाहीत. मात्र, हेच पोलीस अधिकारी-कर्मचारी खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यासाठी नियमांवर बोट का ठेवत नाहीत, अशी विचारणा आता नागरिकांकडून केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागिल दहा महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांची वर्दळ कमी आहे. आता कोरोनाचा ज्वर कमी झाला असून, लसही बाजारात आली आहे. त्यामुळे शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्यामुळे किमान शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी शाळकरी मुलांना रस्ता ओलांडताना मदत करावी, अशी आशा पालकवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग आणि लहान मुलांना पुणे-सोलापूर महामार्गावरून सुरक्षित ये-जा करता यावी यासाठी महापालिका प्रशासनाने पदपथ उभारले आहेत. मात्र, या पदपथाचा दुकानदार आणि फेरीवाल्यांनी सात-बाराच स्वतःच्या नावे करून घेतला आहे. त्यामुळे पदपथावरून कोणीही ये-जा करायची नाही, असा अलिखित नियमच करून टाकला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी उपबाजार ते पुलगेट दरम्यान गर्दीच्या ठिकाणी सायंकाळच्या वेळी खाद्यपदार्थ विक्रेत्यांची आणि खवय्यांची खच्चून गर्दी असते. अर्धा अधिक रस्ता त्यांच्याच मालकीचा असतो, त्यामुळे वाहतूककोंडी होत असल्याचे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याकडे जाण्याची गरज नाही. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी किमान पगार मिळतो, तेवढे जरी काम केले, तर रस्त्यावरील अतिक्रमणे कमी होण्यास 90 टक्के मदत होईल, असा विश्वास अॅड. अमोल कापरे यांनी व्यक्त केला.

आर्थिक हितसंबंधामुळे कारवाई नाही
गल्लीबोळात एखाद्याने घराची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले, तर त्याचा सुगावा लागतो. मात्र, पुणे-सोलापूर महामार्गावर अतिक्रमणांची खच्चून गर्दी झालेली त्यांना का दिसत नाही. कारण त्यामध्ये त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत, असा थेट आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रस्त्यावरील ज्या फेरीवाल्यांकडून हप्ते मिळत नाहीत, त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाते. मात्र, ज्यांच्याकडून हप्ते वेळेवर सुरू आहेत, त्यांनी रस्त्यात दुकान मांडले तरी कारवाई केली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता तरी अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी एक पाऊल पुढे टाकावे, अशी मागणी समान्यजनांकडून केली जात आहे.

वाहन चालवायलाच नको…
रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहन चालविण्यासाठी रस्ताच शिल्लक नसतो. त्यामुळे एसटी, पीएमपीचालक आणि खासगी वाहनचालकही त्रासले आहेत. आता मांजरी उपबाजार ते मगरपट्टा चौक दरम्यान वाहन चालवायलाच नको, अशीच वाहनधारकांची मानसिकता झाली आहे.