Pune News : महापालिका भरणार 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महापालिकेच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या दहावी आणि बारावीतील सुमारे ४ हजार २०० विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क यंदा महापालिका भरणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी अंदाजपत्रकामध्ये यासाठी विशेष तरतूद केली आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये गरिब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. महापालिकेच्यावतीने या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी मोफत बस पासही उपलब्ध करून देण्यात येतात. मागील काही वर्षात महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी दहावीच्या परिक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी महापालिकेच्यावतीने मागील काही वर्षांपासून ५० हजार रुपये शिष्यवृत्तीही देण्यात येते.

यावर्षीपासून स्थायी समितीने विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा शुल्का अभावी परीक्षेपासून वंचित राहावे लागू नये तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क महापालिकेच्यावतीनेच भरण्यासाठी विशेष योजना सुरू केली आहे. सध्या दहावी आणि बारावी परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेच्या शाळांमधून सुमारे ३ हजार ८०० आणि दहावीचे आणि जवळपास ४०० बारावीचे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. त्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून परीक्षा शुल्क महापालिकेच्यावतीने भरण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश जगताप यांनी दिली.