Pune News : लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’ झाल्यास महापालिका कुठलेही लाभ देणार नाही

पुणे –  कोरोना काळात फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या परंतु लस न घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत महापालिकेने कठोर भुमिका घेतली आहे. लस न घेणाऱ्या फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यास त्यांना महापालिकेकडून मिळणारे कुठल्याही सुविधा आणि लाभ दिले जाणार नाहीत, असे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत.

कोरोना काळात वर्षभरापासून महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. आतापर्यंत सातशेहून अधिकजण बाधित झाले असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. 16 जानेवारीला देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना साथीत फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या आरोग्य आणि सर्व शासकीय , निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. महापालिकेचे 18 हजार कर्मचारी असून कोरोना काळात फ्रँटलाईन वर्कर म्हणून ड्युटी बजावणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात केली. परंतु आजही अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस देखील घेतला नसल्याचे समोर आले आहे. या मोहिमेला दोन महिने उलटल्याने पालिका प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

याचाच भाग म्हणून लस न घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यास त्यांना महापालिकेचे मिळणारे कुठलेही लाभ मिळणार नाहीत, असे आदेशच अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. महापालिकेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंशदायी योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा देण्यात येते. तसेच कोरोना मुळे मृत्यू ओढावल्यास संबंधितांच्या वारसांना 50 लाख रुपये किंवा कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि 25 लाख रुपये मदत देण्यात येते.