Pune News : येरवड्यातील वाल्मिकी आवास योजनेची घरे लाभार्थींच्या नावे करा, आ. सुनिल टिंगरे व नगरसेवक कर्णे गुरुजी यांची अजित पवारांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाल्मिकी आंबेडकर आवास (वॅम्बे) योजनेतंर्गत येरवडा येथील महात्मा गांधी नगर व जयप्रकाश नगरमध्ये बांधण्यात आलेली पक्की घरे लाभार्थींच्या नावे हस्तांतरीत करण्यात यावी अशी मागणी आमदार सुनिल टिंगरे व नगरसेवक बाबुराव कर्णेगुरुजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

महात्मा गांधी नगर व जयप्रकाश नगर येथे गवनि घोषित झोपडपट्टीच्या जागी वाल्मिकी आंबेडकर आवास योजनेतंर्गत व बीएसयुपी योजनेतंर्गत विकसीत घरे महसुल व वनविभागाकडून पुणे महापालिकेडे हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव 2 जुलै 2018 पासून महसूल व वन विभागाकडे प्रलंबित आहे. शासनाच्या धोरणानुसार महापालिकेकडे हस्तांतरीत करुन संबधित लाभार्थ्यांच्या नावे हस्तांतरीत करणे बंधनकारक आहे.

त्यामुळे या योजनेतंर्गत बांधण्यात आलेली घरे अद्याप लाभार्थींच्या मालकिची होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे आमदार टिंगरे व नगरसेवक कर्णे गुरुजी यांनी बुधवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणला. तसेच ही घरे महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यासाठी संबधित यंत्रणांना आदेश देण्याची विनंती केली. त्यावर पवार यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.