Pune News : अभिजात सौंदर्य असलेली मराठी न्यायालयातही गरजेची – ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. सुधाकर आव्हाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – मराठी आपली मातृभाषा आहे आणि महात्मा गांधी यांनी तिची तुलना आईच्या दुधाशी केलेली आहे. रवींद्र नाथ टागोर यांनी मराठीला अमृताची उपमा दिली आहे, म्हणूनच आपली मातृभाषा जतन करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. पक्षकारांना त्यांच्या मातृभाषेत न्यायालयीन कामकाज करता आले तर त्यांना आपले विचार योग्य पद्धतीने व्यक्त करता येतील म्हणूनच वकिलांनी न्यायालयात पक्षकारांना समजेल अशा भाषेत आपले म्हणणे मांडणे गरजेचे आहे असे मत कौटुंबिक न्यायालय पुणे येथे मराठी संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. सुधाकर आव्हाड यांनी व्यक्त केले.

Family-Court

या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, जागतिक ज्ञानासाठी इतर भाषा ही येणे गरजेचे असले तरीही मराठी ही आपली प्रथम भाषा असावी. केवळ इंग्रजी येत नाही म्हणून कोणीही न्यूनगंड बाळगू नये. चीन ,जपान ,रशिया इत्यादी देशांचे प्रतिनिधी कोणत्याही आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ही स्वतःच्या भाषेत विचार मांडतात असे उदाहरणही त्यांनी दिले तसेच मराठी भाषेचा इतिहास सांगून त्याच्या अभिजात सौंदर्य बाबतही काही दाखले दिले.

Family-Court

याप्रसंगी बोलताना कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश नाईकवडे यांनी मराठीमधील न्यायनिर्णयाला उच्च न्यायालयानेही पाठिंबा दिल्याचा दाखला दिला तसेच मराठी व्याकरण कसे वापरायचे याबाबतही माहिती त्यांनी दिली. कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष वैशाली चांदणे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाची सुरुवात प्रत्येकाने स्वतः पासुनच करावी असे सांगितले.हॉटेलमध्ये गेलो तरी आपणच हिंदी बोलण्यास सुरुवात करतो,आपल्या मातृभाषेचा आदर आपणच ठेवायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले.

Family-Court

सदरील कार्यक्रमास कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे,न्यायाधीश भालचंद्र हे ही हजर होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी स्वीकारले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक श्रीमती राणी दाते यांनी केले आणि आभार प्रदर्शन समुपदेशक शैलेंद्र शिंदे यांनी केले.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती न्नूरजहाँ मूलवाड समुपदेशक यांनी केले.

 

Family-Court