Pune News : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तरुणांमध्ये देशक्तीचा अंगार फुलवला : प्राचार्य शितोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  भारत दीडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्त, क्रांतिकारक यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. कारण त्यांच्यामध्ये देशभक्तीचा अंगार होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तरूणांमध्ये देशभक्तीचा अंगार फुलवला. सुभाषचंद्र बोस देशभक्तांचे देशभक्त होते, असे प्रतिपादन साधना विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या हडपसरमधील साधना विद्यालयामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रल्हाद पवार, दिलीप क्षीरसागर, शिवाजी मोहिते, सांस्कृतिक विभागप्रमुख सविता पाषाणकर, संगिता रूपनवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी गणेश आगाव या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले.

शितोळे म्हणाले की, तरूणांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी, प्रेरणा मिळावी म्हणून केंद्र सरकारने 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाला जास्तीचे महत्त्व दिले पाहिजे. क्रमिक पुस्तकाबरोबर अवांतर वाचन वाढविण्याची गरज आहे. कारण अलीकडे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, असे त्यांनी सांगितले.

अनिल वाव्हळ यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक शिवाजी मोहिते यांनी आभार मानले.