Pune News : मनपाकडून नवीन कोरोना नियमावली जाहीर; पुणेकरांवर आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोरोनाचा वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर शहरात नवे कडक निर्बंध लागू केले असून याबाबतचा आदेश महापालिका आयुक्तांनी शनिवारी (दि. 20) काढला आहे. यात सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक केली आहे. मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून शहरात 3 हजारांवर रुग्ण सापडत असल्याने पुणेकरांवर आणखी कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय उद्या (रविवारी) जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 20) महापौर मुरलीधर मोहोळ आणि वरिष्ठ अधिका-यांची बैठक झाली. बैठकीनंतर कडक बंधने आणण्यासंबंधीच्या प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समजते. आजच्या आदेशात शहरात सर्व प्रकारच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक धार्मिक, कार्यक्रमांना बंदी असणार आहे. तसेच लग्न समारंभासाठी 50 तर अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.

महत्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे :
1. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील मॉल, थिएटर, रेस्टॉरंट, बार, फूट कोर्ट यांना रात्री 10 पर्यंतच सुरु राहण्याची मुभा
2. घरपोच जेवणाची सुविधा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.
3. प्रतिबंधात्मक सूचनांची माहिती दर्शनीय भागात लावणे बंधनकारक
4. धार्मिक स्थळांमधील प्रवेशावर मर्यादा, ऑनलाईन पासची सुविधा
5. लग्नसमारंभासाठी केवळ 50 जणांना उपस्थित राहता येईल.
6. अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांना परवानगी
7. शहरातील सर्व आस्थापनांमध्ये विनामास्क प्रवेश नाही.
8. प्रवेशद्वारावर थर्मामिटर, थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर ठेवण्यात यावा.
9. हॅन्ड सॅनिटायझर ठेवणे.
10. सुरक्षित अंतर राखले जाईल याकडे लक्ष देणे.