Pune News : नव्याने समाविष्ट झालेल्या सुस-म्हाळुंगे गावांना पायाभूत सुविधांसाठी तरतूद करावी, नगरसेवक अमोल बालवडकर यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेमध्ये नुकतेच गावांचा समावेश करण्यात आला. यामध्ये सुस व म्हाळुंगे हा भाग समाविष्ट करण्यात आला. हा भाग विकसनशील आहे. तसेच याभागातील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत चालली आहे. या वाढत्या लोकसंख्येसोबतच या भागातील अनेक प्रश्न गेली वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. सुस- म्हाळुंगे या गावामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तरतूद उपलब्ध करुन देण्याची मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे आज (बुधवार) लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्तांकडे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, सुस-म्हाळुंगे हा भाग गेली अनेक वर्षांपासून महानगरालगत असून देखील पायाभूत मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईनचा अभाव या भागात मोठ्या प्रमाणात आहे. परंतु हि गावे ग्रामपंचायत हद्दीमध्ये असल्याने या गावांना पुणे महानगरपालीकेच्या इतर सोयी सुविधांचा तितकासा लाभ मिळाला नाही.

तरी या नव्याने पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या सुस व म्हाळुंगे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, रस्ते, पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविणे, ड्रेनेज लाईन या पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी आपण आपल्या 2021-22 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून या गावांसाठी विशेष तरतूद उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापलिका आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली. महापालिका आयुक्तांनी त्यांची हि मागणी मान्य केली असून येत्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात या नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी पायाभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने विशेष तरतूद केली जाईल असे आश्वासन दिले आहे.