Pune News : खासगी चारचाकी वाहनातून प्रवास करताना मास्कची गरज नाही, पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आणि कोरोनावरील लस आल्याने या नियमामध्ये सूट देण्यात आली आहे. पुणे शहरात चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही. परंतु गाडीतील प्रवासी हे कुटुंबातील असले पाहिजेत. ही सवलत फक्त खासगी वाहनांना असणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही. कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनातून पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल. ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यात मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चारचाकी वाहनातून प्रवास करताना मास्क घालणे बंधनकरक करण्यात आले होते. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पुण्यातील कोरोना नियंत्रणात आला असून वाहन चालवताना मास्कची गरज नाही. ही सवलत फक्त खासगी वाहनांनाच देण्यात आली आहे.